नागपूर : प्रतिनिधी
नागपूर जिल्ह्यातील तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या लोकार्पण सोहळ््यात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांसाठी राबविण्यात येत असलेल्या १० मोठ्या योजनांची माहिती दिली. त्यामध्ये आशा सेविकांसाठीची योजना, मुलींना उच्च शिक्षणाची योजना, महिलांना मोफत गॅस सिलेंडर यासह १० योजना महिलांच्या जीवनात निश्चितच बदल घडवतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमात आशा सेविकांना १९०० हून अधिक मोबाईलचे वितरण करण्यात आले. यावेळी वार्षिक रिचार्जही मोफत देणार असल्याचे सांगितले. खनिज विकास निधीमधून वर्षाला लागणारा रिचार्जचा खर्च केला जाईल, असे ते म्हणाले.
आशा सेविकांसाठी राज्य सरकारकडून १० लाख रुपयांचा इन्शुरन्स काढण्यात येतो, अशी माहितीही यावेळी देण्यात आली. राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील अडीच कोटी भगिणींना महिन्याला १५०० रुपयांची मदत देण्यात येणार आहे. राज्यातील सर्व मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याची घोषणाही राज्य सरकारने केली. आतापर्यंत प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मोफत केले होते. आता उच्च शिक्षणही मोफत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये खासगी महाविद्यालयातील फी राज्य सरकारकडून भरण्यात येणार आहे. या योजनेमध्ये एकूण ५०७ कोर्सेसचा समावेश आहे.
यासोबतच महिलांसाठी एसटी बसमध्ये ५० टक्के कन्शेशन देण्याचा निर्णय आधीच घेतला आहे. त्यामुळे महिला प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून एसटीही फायद्यात आल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यासोबतच ज्या महिलांच्या नावावर गॅस सिलेंडर असेल, त्यांना वर्षात तीन सिलेंडर मोफत देण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला. राज्यातील १२ कोटी जनतेकरिता महात्मा फुले आरोग्य योजनेच्या माध्यमातून पाच लाखांपर्यंतचा उपचार मोफत करण्यात आला आहे. या आधी दीड लाख रूपयांपर्यंतचा उपचार मिळायचा. आता पाच लाखांपर्यंतचा उपचार देण्यात येत आहे, असेही फडणवीस म्हणाले.
दवाखाना आपल्या दारी
राज्यातील नागरिकांच्या आरोग्यासाठी सरकारने दवाखाना आपल्या दारी ही योजना सुरू केली. या माध्यमातून आतापर्यंत १६६७ गावांमध्ये जवळपास ६० हजाराहून जास्त कँपचे आयोजन करण्यात आले. या माध्यमातून २.६७ लाख रुग्णांची तपासणी करण्यात आली. या योजनेसाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.