नवी दिल्ली : अहमदाबादमध्ये झालेल्या विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाच्या विमानांमध्ये सातत्याने तांत्रिक बिघाडाच्या घटना घडत आहेत. मंगळवार दि. १७ जून रोजी अहमदाबादहून लंडनला जाणारे एक विमान तांत्रिक बिघाडामुळे रद्द केल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता दिल्लीहून पॅरिसला जाणारे आणखी विमान रद्द केल्याची माहिती समोर आली आहे.
कंपनीने सांगितले की, एअर इंडियाचे दिल्लीहून पॅरिसला जाणारे बोईंग ड्रीमलाइनर एआय१४३ विमान रद्द करण्यात आले आहे. उड्डाण करण्यापूर्वी आवश्यक तपासणी दरम्यान विमानात काही तांत्रिक समस्या आढळून आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. सध्या या विमानाची तपासणी केली जात आहे. अचानक विमानाचे उड्डाण रद्द झाल्याबद्दल कंपनीने दिलगिरीही व्यक्त केली.
एअर इंडियाने म्हटले की प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्हाला खेद आहे. प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानावर लवकरात लवकर पोहोचवण्यासाठी आम्ही पर्यायी व्यवस्था करत आहोत. विमान रद्द झाल्यानंतर आम्ही प्रवाशांसाठी हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली आहे. तसेच, प्रवाशांनी तिकीट रद्द करण्याचा किंवा प्रवासाची वेळ बदलण्याचा पर्याय निवडला, तर कंपनी संपूर्ण परतफेड देईल.