नवी दिल्ली/पुणे : देशभरात गाजत असलेल्या ‘नीट’ (NEET-UG 2026) परीक्षा घोटाळ्यात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) महाराष्ट्रात आणखी एक मोठी कारवाई केली आहे. पुण्यातून मनीषा संजय हवालदार या महिला आरोपीला सीबीआयने बेड्या ठोकल्या आहेत. मनीषा हवालदार हिच्यावर ‘नीट’ परीक्षेचा फिजिक्सचा (भौतिकशास्त्र) पेपर लीक केल्याचा गंभीर आरोप आहे. या अटकेमुळे नीट घोटाळ्यातील एकूण अटक आरोपींची संख्या आता ११ वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण गैरव्यवहारात अटक झालेली ही ‘तिसरी मनीषा’ ठरली आहे.
एनटीएच्या ‘एक्सपर्ट’नेच फोडला पेपर
सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेली मनीषा हवालदार ही पुण्यातील प्रसिद्ध ‘सेठ हिरालाल सराफ प्रशाला’ येथे कार्यरत होती. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) तिला NEET-UG 2026 परीक्षा प्रक्रियेत ‘विषय तज्ज्ञ’ (Expert) म्हणून नियुक्त केले होते. या महत्त्वाच्या पदामुळे तिला फिजिक्सच्या गोपनीय प्रश्नपत्रिकांपर्यंत थेट प्रवेश (Access) मिळाला होता. याच संधीचा गैरफायदा घेत तिने एप्रिल २०२६ दरम्यान परीक्षेचे अनेक मूळ प्रश्न सहआरोपी प्रा. मनीषा मांढरे हिला पाठवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
मूळ प्रश्नपत्रिकेशी प्रश्न तंतोतंत जुळले
मनीषा हवालदार हिने लीक केलेले आणि मनीषा मांढरेला पाठवलेले फिजिक्सचे प्रश्न NEET-UG २०२६ च्या अधिकृत प्रश्नपत्रिकेच्या सेटमधील प्रश्नांशी हुबेहूब आणि तंतोतंत जुळले आहेत. यामुळे परीक्षा सुरू होण्यापूर्वीच पेपर फुटल्याचे आणि त्यासाठी एनटीएच्या अंतर्गत यंत्रणेचाच वापर झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी सीबीआयने १६ मे २०२६ रोजी मॉडर्न कॉलेजमधील शिक्षिका आणि एनटीएची तज्ज्ञ प्रा. मनीषा मांढरे हिला अटक केली होती, तिच्या चौकशीतूनच हवालदारचे नाव समोर आले.
नीट घोटाळ्यात आतापर्यंत ११ जणांना बेड्या
या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी सीबीआयने देशभरात मोठी मोहीम उघडली आहे. आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर (अहमदनगर) येथून ११ जणांना अटक करण्यात आली आहे. विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये लॅपटॉप, मोबाईल फोन, बँक खात्यांचे स्टेटमेंट्स आणि अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आली असून, त्यावरून पैशांच्या व्यवहाराचा सखोल तपास सुरू आहे.
















