20.9 C
Latur
Sunday, September 15, 2024
Homeसोलापूरसुस्ते येथून आणखी एका बनावट नवरीने ठोकली धुम

सुस्ते येथून आणखी एका बनावट नवरीने ठोकली धुम

पंढरपूर / प्रतिनिधी
गेल्या पाच दिवसांपूर्वी सुस्ते (ता. पंढरपूर) येथील बोगस वधू-वर सुचक मंडळ चालविणाऱ्या भामट्या एजंटाने जुळवलेल्या लग्नातील नवरीने अवघ्या तीनच दिवसांत ऐवजासहीत पलायन केल्याची घटना ताजी असतानाच येथून आणखी एका बनावट नवरीने धूम ठोकली. या घटनेने सुस्ते परिसरात चर्चेला उधाण आले आहे.

याबाबत फसगत झालेल्या नवरोबाच्या नातलगांनी सांगितलेल्या वृत्तानुसार, वधू-वर सूचक मंडळ चालविणाऱ्या एजंटाच्या मध्यस्थीने यातील लग्न जुळलेले होते. त्याने नवरी म्हणून मुलगी दाखवून नवदेवाकडील लोकांकडून तब्बल दोन लाख रूपये मध्यस्थ कमीशन म्हणून घेतले होते. ठरल्यानुसार धुमधडाक्यात लग्न पार पडले. लग्नानंतर पाचव्या दिवशी सत्यनारायणाची पूजा घालण्यात आली. नव्या नवरीने कुटूंबातील सर्व सदस्यांना जेवण वाढले. यादरम्यान, सर्वाची नजर चुकवत तिने जेवणातील पदार्थात गुंगी येण्याचे औषध मिसळले असल्याचा संशय आहे. कारण जेवणानंतर सगळ्यांनाच ग्लानी येऊन लवकर झोप लागली. नवरदेवासह सर्वजण कांही वेळातच गाढ झोपी गेले. नेमकी ही संधी साधत नव्या नवरीने मध्यरात्रीच्या सुमारास धूम ठोकली.

वय झालेल्या लग्नाळू मुलाला नवरी मिळत नसल्याने एजंटाच्या भुलथापांना बळी पडून आई-वडिलांनी लग्नाचा हा योग जुळवून आणला होता. विशेष म्हणजे अर्धा एकर शेतजमीन विकून थाटात लग्न उरकून घेतले होते. मात्र, सत्यनारायण दिवशीच नवरी पळून गेल्याने झालेली फसगत अन् अर्धा एकर शेतजमीन गेल्याचे दुःख यामुळे संबंधित कुटुंबावर चांगलीच पश्चात्ताप करण्याची वेळ आली आहे. फसवे व नकली वधू-वर सुचक मंडळ चालवत असलेल्या या मंडळात देखण्या व सुस्वरूप तरण्या मुली, महिलांचा मोठा भरणा आहे. त्याच-त्या मुली, महिलांना नवरी म्हणून दाखवायचे. लाखो रूपये घेऊन लग्न जुळवायचे. त्यानंतर चार-पाच दिवसांत नवरी पळून गेली की दुसरे सावज गाठायचे, हा धंदा एजंटामार्फत मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.

यात मिळालेली रक्कम हे भामटे वाटून घेतात. तसेच नवरीच्या अंगावरील दागिने तसेच तिने नवरदेवाच्या घरातून चोरून आणलेले दागिने, पैसे हा फायदा वेगळाच. अशा घटना सर्सासपणे घडू लागल्या आहेत. दुसरीकडे अब्रुचे खोबरे होऊन मोठी फसगत झालेली नवरदेवाकडील माणसे पोलिसांचा ससेमिरा मागे नको म्हणून तक्रारही देत नाहीत. तक्रार दाखल केली तर अशी प्रकरणे तडजोड करून मिटवण्याकडे पोलिसांचा कल असल्याचे बोलले जात आहे. लग्नाळू मुलांची अशा प्रकारे होणारी मोठी फसगत टाळण्यासाठी पोलिसांनी संबंधित टोळीचा पर्दाफाश करावा, अशी मागणी होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR