नवी दिल्ली : वृत्तसंस्था
संसद सुरक्षा भंग करून लोकसभेत आंदोलन केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आणखी एकाला अटक केली. दिल्ली पोलिसांनी महेश कुमावत या आरोपीला अटक केली. या प्रकरणी आतापर्यंत एकूण ६ जणांना अटक करण्यात आली. दरम्यान, तपास पथकाने आरोपींचा जळालेला मोबाईल फोन, कपडे आणि बूटदेखील जप्त केले आहेत.
या अटकेनंतर महेश कुमावतला दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आले, कोर्टाने कुमावतला ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पोलिसांनी १५ दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र, कोर्टाने ७ दिवसांचीच कोठडी सुनावली. महेशचे इन्स्टाग्राम डीकोड करून तपास पथकाने अनेक गोष्टींचा गौप्यस्फोट केला. महेशवर तरुणांना भडकावण्याचा तसेच व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचे ब्रेनवॉश केल्याचा आरोप आहे. तो त्याच्या इन्स्टाग्रामवर क्रांतिकारकांची छायाचित्रे पोस्ट करत असे.
कटात महत्त्वाची भूमिका बजावली
आरोपी महेश कुमावत याने ललित झा याला लपून राहण्यास मदत केली होती. संसदेची सुरक्षा व्यवस्था छेदून लोकसभेत आंदोलन करण्याच्या कटात आरोपी महेश कुमावत याचाही मोठा वाटा आहे. त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टवरून ही बाब उघड झाली आहे. तो केवळ आरोपींना रसद पुरवत नव्हता तर या गटात आणि कटातही त्याची महत्त्वाची भूमिका होती.