अमृतसर : येथील ग्रामीण पोलिसांनी आंतरराष्ट्रीय शस्त्र आणि स्फोटकांची तस्करी करणा-यांच्या नेटवर्कवर मोठी कारवाई करत एका गुन्हेगाराला बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईदरम्यान पोलिसांनी त्याच्याकडून १ एके-४७ रायफल, एक मॅगझिन, जिवंत काडतुसे आणि २ अत्याधुनिक हँड ग्रेनेड जप्त केले आहेत. ही कारवाई सुरक्षा यंत्रणांसाठी मोठे यश मानली जात आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे उघड झाले आहे की अटक करण्यात आलेला आरोपी परदेशातील तस्करांच्या थेट संपर्कात होता. त्यांच्याच मार्फत तो भारतात बेकायदेशीर शस्त्रे आणि स्फोटक सामग्री मागवण्याच्या आणि पुरवण्याच्या गंभीर गुन्ह्यात सक्रियपणे गुंतलेला होता. या प्रकरणी अमृतसर येथील घरिंदा पोलिस ठाण्यात शस्त्र कायदा आणि स्फोटक पदार्थ कायद्याच्या संबंधित कलमांरम्यान गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या संपूर्ण रॅकेटचे जाळे कुठेकुठे पसरले आहे, याचा छडा लावण्यासाठी तसेच या गुन्हेगारी साखळीतील मागील आणि पुढील दुवे शोधण्यासाठी पोलिस सध्या कसून तपास करत असल्याची माहिती अशी माहिती पोलीस महासंचालकांनी सोशल मीडियावरील एक्सवरील पोस्टमध्ये दिली.
दरम्यान, पंजाब पोलिसांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून दिलेल्या माहितीनुसार, राज्यात अवैध शस्त्र तस्करी आणि गुन्हेगारी नेटवर्कवर करडी नजर ठेवली जात आहे. अवैध पुरवठा साखळीत सामील असलेल्या प्रत्येक देशविघातक घटकावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पंजाब पोलीस पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे पोलिसांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
















