30.4 C
Latur
Friday, February 13, 2026
Homeराष्ट्रीयआसामच्या कोकराझारमध्ये सेना तैनात

आसामच्या कोकराझारमध्ये सेना तैनात

बोडो, आदिवासी समूहांमधील संघर्षात २ जणांचा मृत्यू

गुवाहाटी : आसाममधील कोकराझार जिल्ह्याच्या संवेदनशील भागांमध्ये सैन्य तैनात करण्यात आले आहे. येथे बोडो आणि आदिवासी समुदायांमधील संघर्षात दोन लोकांचा मृत्यू झाला होता. यानंतर येथे हिंसाचार भडकला. हल्ल्यांच्या भीतीने अनेक ग्रामस्थ आपली घरे सोडून पळून गेले आहेत.

संरक्षण प्रवक्त्याने सांगितले की, लष्कराच्या जवानांनी मंगळवारी रात्री करिगाव आणि त्याच्या आसपासच्या परिसरात गस्त घातली. बुधवारी परिसरात फ्लॅग मार्चही काढण्यात आला. प्रवक्त्यानुसार, सध्या जिल्ह्यात लष्कराच्या एकूण चार तुकड्या तैनात आहेत. परिस्थिती आता नियंत्रणात आहे. कोकराझार आणि शेजारच्या चिरांग जिल्ह्यात कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स आधीच परिसरात उपस्थित आहे.

हिंसेची सुरुवात कशी झाली?
गृह विभागाच्या अधिका-यांच्या मते, सोमवारी रात्री करिगाव चौकी अंतर्गत मानसिंह रोडवर तीन बोडो लोकांना घेऊन जाणा-या गाडीने दोन आदिवासी व्यक्तींना धडक दिली. यानंतर जवळच्या आदिवासी गावातील लोकांनी गाडीतील लोकांसोबत मारामारी केली आणि वाहन पेटवून दिले. या घटनेत एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर दुस-या व्यक्तीने मंगळवारी उपचारादरम्यान प्राण सोडले. इतर तीन जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिस कर्मचारीही जखमी
मंगळवारी परिस्थिती आणखी बिघडली जेव्हा बोडो आणि आदिवासी समुदायाच्या लोकांनी करिगाव आउटपोस्टजवळ राष्ट्रीय महामार्ग अडवला, टायर जाळले, एका सरकारी कार्यालयाला आग लावली आणि करिगाव पोलीस चौकीवर हल्ला केला. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. यात काही पोलिस कर्मचा-यांसह अनेक लोक जखमी झाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR