मुंबई : संगीत विश्वाची आशा आज काळाच्या पडद्याआड गेलीये. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे ९३ व्या वर्षी निधन झाले आहे. आशा भोसलेंच्या निधनाची बातमी सर्वांसाठी धक्कादायक आहे. बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री श्रद्धा कपूरवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. विशेष म्हणजे, दिग्गज गायिका आशा भोसले यांच्याशी श्रद्धाचे कौटुंबिक नाते होते. अनेकांना ठाऊक नसेल, पण श्रद्धा कपूर ही आशा भोसले आणि गानकोकिळा लता मंगेशकर यांची नात लागते.
श्रद्धा कपूर अनेकदा सण-समारंभात किंवा खास प्रसंगी आशा भोसले यांची भेट घेताना दिसली आहे. काही काळापूर्वी श्रद्धाने आपल्या आजीसोबतचा एक गोड फोटो शेअर करत आशा ताईंच्या साधेपणाचे आणि नव्वदी ओलांडलेल्या आशाताईंच्या एनर्जीचे कौतुक केले होते. श्रद्धाने स्वत: देखील अनेक चित्रपटांत पार्श्वगायन केले आहे. तिच्यावर कलेचा हा वारसा मंगेशकर आणि कोल्हापुरे घराण्याकडूनच आला असल्याचे बोलले जाते. श्रद्धा कपूरसाठी आशा भोसले केवळ एक दिग्गज कलाकार नसून त्या तिच्या कुटुंबाचा एक अविभाज्य भाग होत्या. एका मुलाखतीत श्रद्धाने म्हटले होते की, आपल्या कुटुंबात अशा महान व्यक्तींचे असणे हे तिच्यासाठी खूप प्रेरणादायी आणि अभिमानास्पद आहे. आशा भोसले यांच्या निधनानंतर श्रद्धा कपूरवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आधी लतादीदींचं जाणं आणि आज आशाताईंची प्राणज्योत मालवल्याने श्रद्धा आणि तिचं कुटुंब शोकाकुल आहे.
कौटुंबिक संबंध
श्रद्धा कपूरचे नाना (शक्ती कपूर यांचे सासरे) पंडित पंढरीनाथ कोल्हापुरे हे लता मंगेशकर आणि आशा भोसले यांचे चुलत भाऊ होते. श्रद्धाचे वडील शक्ती कपूर यांनी शिवांगी कोल्हापुरे यांच्याशी विवाह केला आहे. या नात्याने लता मंगेशकर आणि आशा भोसले या श्रद्धा कपूरच्या आजी आहेत. श्रद्धा अनेकदा आशा भोसले यांना आजी म्हणून हाक मारायची आणि त्यांच्याशी तिचे खूप जवळचे नाते आहे.

