कासीबुग्गा : वेंकटेश्वर मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत नऊ जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला. त्यांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या वारसदारांना प्रत्येकी २ लाख रुपये व जखमींना प्रत्येकी २ हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली.
ते म्हणाले की, श्रीकाकुलममधील वेंकटेश्वर स्वामी मंदिरातील चेंगराचेंगरीची घटना वेदनादायी आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. मंदिरात कार्यक्रमाकरिता पोलिस बंदोबस्तासाठी व्यवस्थापनाने अर्जही केलेला नव्हता व परवानगीही घेतलेली नव्हती, असे श्रीकाकुलम पोलिसांनी सांगितले. २०२५ मध्ये आंध्र प्रदेशातील तीन प्रमुख मंदिरांमध्ये झालेल्या अपघातांमध्ये २२ लोकांचा मृत्यू झाला आणि सुमारे १०० जण जखमी झाले. जानेवारीत तिरुपतीमधील बैरागी पट्टाडा येथे झालेल्या चेंगराचेंगरीत सहा भाविकांचा मृत्यू झाला होता.
कार्तिक मास, एकादशीमुळे वाढली गर्दी
आंध्र प्रदेशच्या गृहमंत्री वंगलापुडी अनिता यांनी सांगितले की, सदर मंदिरात दर्शनासाठी भक्त जात असताना रेलिंग तुटले आणि काही लोक खाली पडले. त्यांच्या अंगावर इतर लोक पडले. मंदिरात प्रत्येक शनिवारी दीड ते दोन हजार भक्त दर्शनासाठी येतात. कार्तिक मास व एकादशी एकाच तसेच शनिवारी आल्यामुळे मोठया् संख्येने भक्त मंदिरात जमले आणि त्यातून ही दुर्घटना घडली.















