वॉशिंग्टन : इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या आठव्या दिवशी पहिल्यांदाच अमेरिका आणि इस्रायल यांच्यात गंभीर मतभेद समोर आले आहेत. इस्रायलने शनिवारी एकाच दिवसात इराणच्या ३० इंधन डेपोंवर एकापाठोपाठ एक भीषण हल्ले केले. अमेरिकेच्या अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार हे हल्ले इतके व्यापक असतील याची त्यांना कल्पना नव्हती. अमेरिकेने याला चुकीचा निर्णय असे म्हटले आहे.
एक्सिओसच्या रिपोर्टनुसार, इस्रायली सैन्याने इंधन डेपोंवर हल्ला करण्यापूर्वी अमेरिकेला सूचना दिली होती, मात्र हल्ल्याची व्याप्ती अपेक्षेपेक्षा कितीतरी मोठी होती. अमेरिकेच्या एका अधिका-याने सांगितले की, हल्ल्याचा परिणाम इतक्या मोठ्या प्रमाणावर होईल हे पाहून त्यांना धक्का बसला आहे. एका इस्रायली अधिका-याच्या म्हणण्यानुसार, वॉशिंग्टनचा मेसेज अत्यंत कठोर होता, ज्याचे वर्णन त्यांनी डब्ल्यूटीएफ असे केले.
राष्ट्राध्यक्षांना हा हल्ला आवडलेला नाही
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका सल्लागाराने सांगितले की राष्ट्राध्यक्षांना हा हल्ला आवडलेला नाही. त्यांना तेल वाचवायचे आहे, जाळायचे नाही. अशा दृश्यांमुळे लोकांना वाढती महागाई आणि पेट्रोलच्या किमतींची आठवण होते. इस्रायली सैन्याने आपल्या भूमिकेचे समर्थन करताना म्हटले की, या डेपोचा वापर इराणी सैन्याला इंधन पुरवठा करण्यासाठी केला जात होता. इस्रायलच्या मते हा हल्ला इराणसाठी एक संकेत आहे की त्यांनी इस्रायलच्या नागरी पायाभूत सुविधांना टार्गेट करणे थांबवावे.
तेहरानमध्ये ‘काळा पाऊस’
इस्रायली हवाई हल्ल्यानंतर तेहरानमध्ये एक भीतीदायक दृश्य पाहायला मिळाले. तेल डेपोला लागलेल्या भीषण आगीतून निघालेले धुराचे कण ढगांमध्ये मिसळले. जेव्हा तेहरानमध्ये पाऊस झाला, तेव्हा तो काळ्या पावसाच्या स्वरूपात पडला. या विषारी पावसामुळे रस्ते, गाड्या आणि घरांचे छत काळे झाले असून आरोग्य आणि पर्यावरणाचे मोठे संकट उभे राहिले आहे.

