22.9 C
Latur
Monday, July 7, 2025
Homeअंतरराष्ट्रीयअमेरिकेच्या सैन्य तळांवर हल्ला

अमेरिकेच्या सैन्य तळांवर हल्ला

इराणचे प्रत्युत्तर, सीरियातील अमेरिकेचे तळ उद्ध्वस्त!

तेहरान : वृत्तसंस्था
इराण-इस्रायल युद्धात अमेरिकेने उडी घेतली आणि इराणमधील ३ अण्वस्त्र तळांवर एअर स्ट्राईक केला. जमिनीखाली असलेले तळ उद्ध्वस्त करण्याच्या हेतूने बी-२ बॉम्बर विमानांनी बंकर बस्टर बॉम्ब टाकले. जमिनीखाली असलेले तळ उद्ध्वस्त करण्यासाठी त्यांचा वापर होतो. यानंतर आता अमेरिकेच्या सैन्य तळावर मोठा हल्ला झाला. सीरियातील अमेरिकेचे तळ लक्ष्य करण्यात आले आहेत. इराणमधील अमेरिकेच्या हल्ल्याला ३६ तास उलटल्यानंतर अमेरिकन तळावर हल्ला झाला आहे.

अमेरिकेच्या तळावरील हल्ला इराणने केला असल्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्याभरापासून इराण-इस्रायल यांच्यात संघर्ष सुरू आहे. दोन्ही देश एकमेकांवर हवाई हल्ले चढवत आहेत. या युद्धात अमेरिका इस्रायलच्या बाजूने उतरला आहे. अमेरिकेने २२ जूनला इराणच्या ३ आण्विक प्रकल्पांवर एअर स्ट्राईक केला. ऑपरेशन मिडनाईट हॅमरच्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. त्यानंतर आता सीरियाच्या पश्चिम हसाका प्रांतात असलेल्या अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला झालेला आहे. अद्याप तरी या हल्ल्याची जबाबदारी कोणीही घेतलेली नाही. अमेरिकेने युद्धात उडी घेतल्यास मध्य पूर्व आशियातील त्यांच्या सैनिकी तळांवर हल्ले करू, अशी थेट धमकी इराणने आधीच दिली होती. त्यामुळे हा हल्ला इराणनेच केलेला असण्याची शक्यता आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार पश्चिमी हसाका प्रांतातील एका भागात असलेल्या अमेरिकेच्या लष्करी तळाला लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यानंतर तळाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्रात इराणचे राजदूत आमिर सईद इरावानी यांनी ३ ठिकाणांवर प्रत्युत्तरादाखल हल्ल्याचे संकेत दिले होते.

तेलाच्या किमती वाढवू नका
इराण-इस्रायल युद्धामुळे मध्य आशियात तेलाच्या किमती भडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यावर आता अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कच्च्या तेलाच्या किमती वाढवू नयेत, असे इशारेवजा म्हटले आहे.

भारताला तेल कमी पडणार नाही
इराणने होर्मुझ सामुद्रध्वनी बंद केल्यास सौदी अरेबिया आणि रशियाकडून तेल मिळविण्यासाठी दुस-या मार्गाचा अवलंब केला जाऊ शकतो. भारत सौदी अरेबियातून १८ ते २० टक्के तेल आयात करतो. त्यासाठी होर्मुझ सामुद्रध्वनीऐवजी पेट्रोलाईन-यानबू कॉरिडॉरचा वापर केला जाऊ शकतो. भारताकडे सध्या ९० दिवस जाईल, एवढ्या कच्च्या तेलाचा साठा आहे.

इराणकडून क्षेपणास्त्रांचा मारा
अमेरिकेने युद्धात उडी घेतल्यामुळे इराणने आक्रमक पवित्रा घेत इस्रायवर जोरदार क्षेपणास्त्र, ड्रोन हल्ले सुरू केले. उत्तर इस्रायलमध्ये सोमवारी मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्राचा मारा केला. या हल्ल्यात एश्होद शहर बेचिराख झाले. यासोबतच तेल अविव, हायफा यासारख्या शहरांवर हल्ले केले. इराणने इस्रायलवर जवळपास ४० मिनिटे क्षेपणास्त्र डागली.

इस्रायलकडून हवाई तळ उद्ध्वस्त
एकीकडे इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा केलेला असतानाच इस्रायलनेही जोरदार हल्ला चढवत इराणधील हवाई तळ, बंकर, फायटर जेट नष्ट केली. इराणच्या पश्चिमी, पूर्व आणि मध्य भागातील जवळपास ६ हवाई तळांवर हल्ला केल्याचे इस्रायली सैनिकांनी सांगितले. या हल्ल्यात इराणचे मोठे नुकसान झाले. या हल्ल्यांमुळे मध्य आशियात तणाव वाढला आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR