आष्टी (जि. बीड) : आष्टी तालुक्यात तहसीलदार वैशाली पाटील यांनी सीना नदीपात्रात अवैध वाळू उपसा करणा-या माफियांवर मोठी कारवाई केली आहे. मात्र, कारवाईनंतर महसूल पथकातील कर्मचा-यांना वाळू माफियांनी शिवीगाळ, धक्काबुक्की करत मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना घडली आहे.
तहसीलदार वैशाली पाटील यांना गुप्त बातमीदारांमार्फत सीना नदीपात्रात संगमेश्वर मंदिराजवळ, हिंगणी येथे अवैध गौण खनिज व वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ पथकासह छापा टाकला. या कारवाईत महसूल पथकाने एक पिवळ्या रंगाचा जेसीबी, नंबर नसलेले तीन ट्रॅक्टर, एक ट्रॉली आणि घटनास्थळी साठवलेली ३० ब्रास वाळू, असा एकूण ५१ लाख ३ हजार ४०० किमतीचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त केला. पथकामध्ये तलाठी राजकुमार आचार्य (मातकुळी), प्रवीण शिंदे(चिखली), स्रेहल थेटे(खडकत), योगेश गोरे (धानोरा), मंडळ अधिकारी सुभाष गोरे, महसूल सहायक दिलीप गालफाडे आणि महसूल शिपाई कुंदन बावरे यांचा समावेश होता.
कर्मचा-यांवर हल्ला
जप्त केलेला मुद्देमाल तहसील कार्यालयाकडे घेऊन येत असताना, आष्टी शहरातील खडकत चौकात फॉरेस्ट ऑफिसजवळ तीन अनोळखी इसम क्रेटा (एमएच ४२ बीई ०७७६) गाडीतून आले आणि त्यांनी महसूल पथकाशी हुज्जत घालून कर्मचा-यांना धक्काबुक्की केली. वाळू माफियांनी कर्मचा-यांचा मोबाइल हिसकावून घेतला आणि कर्मचा-यांच्या अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर शुभम करडुळे व इतरांनी आणखी काही वाहने आणून महसूल पथकाच्या ताब्यातून एक ट्रॅक्टरचे हेड/धुड जबरदस्तीने पळवून नेले. पथकातील तलाठी प्रवीण शिंदे आणि इतरांना चापटांनी व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. या गंभीर घटनेनंतर तलाठी सचिन विठ्ठल तेलंग यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आष्टी पोलिस ठाण्यात वाळू माफियांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

