पुणे : भोर तालुक्यातील खेड-शिवापूर परिसरातील बांडेवाडी येथे बुरखा घालून आलेल्या चार संशयितांनी ज्वेलर्स दुकानात दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. हातात कोयते आणि बंदुकांसारखी घेऊन त्यांनी दुकानदाराला धमकावत लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेजारील दुकानदाराने प्रसंगावधान राखत आरडाओरडा केल्याने संशयितांचा डाव फसला. त्यानंतर चौघेही घटनास्थळावरून पसार झाले.
शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास बांडेवाडी परिसरातील ‘श्रीनाथ ज्वेलर्स’ या दुकानात ही घटना घडली. चार संशयित बुरखा घालून दुकानात शिरले होते. त्यांच्याकडे कोयते आणि बंदुकांसारखी शस्त्रे होती. दुकानात प्रवेश केल्यानंतर त्यांनी शस्त्रांचा धाक दाखवून दुकानदाराला लुटण्याचा प्रयत्न सुरू केला.
दरम्यान, शेजारील दुकानातील दुकानदाराला बुरखा घालून आलेल्या व्यक्तींच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यामुळे त्याने श्रीनाथ ज्वेलर्समध्ये डोकावून पाहिले. दुकानात सुरू असलेला प्रकार लक्षात येताच त्याने मोठ्याने आरडाओरडा केला. आवाज ऐकताच संशयित घाबरले आणि त्यांनी तातडीने तेथून पळ काढला. त्यामुळे संभाव्य मोठी घटना टळली.
















