पुणे : शिवसंग्राम संघटनेचे दिवंगत अध्यक्ष विनायक मेटे यांची विमाननगर भागातील सदनिका बळकावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्यांची बहीण आणि तिच्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेटे यांच्या मुलाने याबाबत विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत आशुतोष विनायक मेटे (वय २०, रा. कोरेगाव पार्क) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मेटे यांची बहीण सत्यशीला महादेव जाधव आणि त्यांचा मुलगा आकाश (दोघे रा. पंचगंगा सोसायटी, ठाणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदनिका मेटे यांच्या पत्नीच्या नावावर आहे.
जाधव यांनी कुलूप तोडून सदनिकेचा बेकायदा ताबा घेण्याचा प्रयत्न केला, अशी फिर्याद देण्यात आली आहे. मेटे यांचा मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर काही महिन्यांपूर्वी अपघाती मृत्यू झाला होता. त्यांनी विमाननगर भागातील गंगापूरम सोसायटीत सदनिका खरेदी केली होती. मेटे यांनी सदनिका बहीण सत्वशीला आणि भाचा आकाश यांना भेट दिली होती, असा दावा जाधव यांच्याकडून करण्यात आला आहे.