Homeराष्ट्रीयशशी थरूर यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न

शशी थरूर यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न

मलप्पूरम : काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या वाहनांना घेरून त्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. केरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यूडीएफ उमेदवार ए. पी. अनिल कुमार यांच्या प्रचारासाठी शशी थरूर जात होते. त्यावेळी सात ते आठ जणांनी ताफा अडवत हल्ला करत थरूर यांच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केरळमधील मलप्पूरम जिल्ह्यातील वंडूर भागात यूडीएफ उमेदवारांच्या प्रचारासाठी दोन गाड्यांच्या ताफ्यासह शशी थरूर जात होते. पुढील गाडीत ते बसले होते. तर, मागील गाडीत त्यांचे सुरक्षा कर्मचारी होते. तेव्हा दोन कारमधून आलेल्या आठ जणांनी थरूर यांचा ताफा रोखला.
हल्लेखोरांनी थरूर यांच्या गाडीच्या काचांवर मारले. तेव्हा मागील गाडीत असलेला थरूर यांचा सुरक्षा रक्षक बाहेर आला. त्याने मध्यस्थी करत हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याला देखील धक्काबुक्की करण्यात आली. त्यामुळे काही काळ येथे तणाव निर्माण झाला होता.

दोन जणांना अटक
या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार देण्यात आली आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत हल्लेखोरांपैकी दोघांना अटक केली आहे. हा हल्ला पूर्वनियोजित आहे की केवळ रस्त्यावर झालेल्या किरकोळ वादाचा आहे याचा तपास पोलिस करत आहेत. दरम्यान, ९ एप्रिलला केरळ विधानसभेसाठी मतदान होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR