नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू असताना एका वकिलाने सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने बूट फेकून मारण्याचा प्रयत्न सोमवार दि. ६ ऑक्टोबर रोजी केला. मात्र सुरक्षारक्षकांनी प्रसंगावधान साधत या वकिलाला अडवले आणि न्यायालयाबाहेर नेऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. हा वकील सरन्यायाधीशांवरील संताप व्यक्त करत त्यांच्याजवळ पोहोचला. त्यानंतर तो बूट काढू लागला. तो बूट फेकून मारणार इतक्यात सुरक्षारक्षकांनी त्याला पकडले आणि बाहेर नेले. सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही, अशा स्वरुपाच्या घोषणा देखील या वकिलाने यावेळी दिल्या.
अलीकडेच विष्णू मंदिरासंदर्भातील एका प्रकरणाची सुनावणी करत असताना सरन्यायाधीश गवई याचिकाकर्त्याला म्हणाले होते की तुमची तक्रार असेल तर तुम्ही भगवान विष्णूकडे जा. त्यावर काही लोकांनी, हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेत सरन्यायाधीशांवर टीका केली होती. याच वक्तव्याचा संताप व्यक्त करत एका वकिलाने आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू असताना थेट सरन्यायाधीशांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
काय होते प्रकरण?
मध्यप्रदेशमधील प्रसिद्ध खजुराहो मंदिर परिसरातील जावरी मंदिरातील सात फूट उंच भगवान विष्णूची शीर नसलेली मूर्ती हटवून त्या ठिकाणी भगवान विष्णूची नवी मूर्ती बसवावी अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात १७ सप्टेंबर रोजी फेटाळून लावली होती. न्यायालयाने स्पष्ट केलं की हे प्रकरण पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या (एएसआय) अखत्यारित येते.
सरन्यायाधीशांची काय होती टिप्पणी?
सरन्यायाधीश बी. आर. गवई त्यावेळी म्हणाले होते की तुम्ही इथून जा आणि भगवान विष्णूकडेच प्रार्थना करा आणि त्यालाच काहीतरी करायला सांगा. तुम्ही असे म्हणताय की तुम्ही भगवान विष्णूचे भक्त आहात. मग भगवान विष्णूलाच काहीतरी करायला सांगा. कारण ते (खजुराहो मंदिर) पुरातत्व विभागाच्या अखत्यारित येणारे स्थळ आहे. पुरातत्व विभागाच्या परवानगीशिवाय तिथे काही करता येत नाही. तिथे काहीही करायचे असेल तर एएसआयची परवानगी घ्यावी लागते. त्यामुळे आम्ही या प्रकरणात दखल देऊ शकत नाही, याबाबत आम्हाला खेद वाटतो.
विचलीत होऊ नका : सरन्यायाधीश
अनपेक्षित घटनेनंतरही सरन्यायाधीश गवई यांनी पूर्ण शांतता आणि संयम राखला. त्यांनी कोणताही गोंधळ न करता पुढील वकिलाला आपली बाजू मांडण्यास सांगितले आणि उपस्थितांना उद्देशून म्हणाले त्यामुळे विचलित होऊ नका, आम्हीही झालो नाही. त्यांच्या या प्रतिक्रियेने न्यायालयीन शिस्त, स्थैर्य आणि संतुलनाचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले.
बूट फेकणा-या वकिलाचे निलंबन
सरन्यायाधीशांवर बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकारानंतर आता बार कौन्सिल ऑफ इंडियाने वकील राकेश किशोर यांना प्रॅक्टिसमधून निलंबित केले आहे. सत्तरच्या जवळपास वय असलेल्या या वकिलाने पोलिसांना सांगितले की, सरन्यायाधीशांनी खजुराहो मंदिरांसंदर्भात केलेल्या विधानामुळे तो नाराज होता.
देशात विष पेरले जातेय : शरद पवार
आपल्या देशात पेरले जाणारे विष आता संविधानाच्या सर्वोच्च संस्थांनाही जुमानत नाही, ही देशासाठी धोक्याची घंटा आहे असे म्हणत शरद पवार यांनी सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नावर चिंता व्यक्त केली. या घटनेबद्दल शरद पवार म्हणाले, लोकशाही आणि संविधानाच्या मूल्यांना आधार मानून वाद-प्रतिवादातून न्याय्य भूमिकेकडे जाण्यासाठी न्यायव्यवस्था असते. त्याच न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च संस्थेत मुख्य न्यायमूर्तींवरच अशा प्रकारे हल्ल्याचा प्रयत्न होणे हा केवळ न्यायव्यवस्थेचाच नव्हे तर लोकशाहीचा, संविधानाचा आणि देशाचा घोर अवमान आहे.

