25.5 C
Latur
Saturday, September 18, 2021
Homeऔरंगाबादशहरापेक्षाही वेगाने ग्रामीण भागात कोरोनाची वाढ

शहरापेक्षाही वेगाने ग्रामीण भागात कोरोनाची वाढ

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाचा आलेख वाढतच आहे. सक्रिय रुग्णसंख्याही वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. गेल्या ६ दिवसात ८,८१६ बाधितांची जिल्ह्यात भर पडली आहे. त्यातील शहरात ४,२६३ तर ग्रामीण भागात तब्बल ४,५५३ रुग्ण आढळले. दररोजच्या रुग्णवाढीतही शहरालगतच्या गावांमधील बाधित रुग्णसंख्येचा टक्का वाढल्याने चिंता व्यक्त होत आहे.

पहिल्या लाटेत ग्रामीण भागात शहरालगतची व बाजारपेठांची गावे वगळता फारसे संक्रमण झाले नव्हते. मात्र, गेल्या आठवडाभरात सातत्याने शहरापेक्षा ग्रामीणमध्ये बाधित अधिक संख्येत आढळून येत आहेत. त्यातही गंभीर झालेले रुग्ण ग्रामीण भागातून शहरात संदर्भित होत आहेत. बेडची शोधाशोध करताना नातेवाईकांची दमछाक होत आहे. बाधितांचा शोध, तपासणी आणि लसीकरण करुन घेण्यासाठी ग्रामदक्षता समित्या नेमल्या गेल्या. मात्र, लसींचा आवश्यक तेवढा पुरवठा होत नसल्याने लसीकरणाची टक्केवारी घसरल्याची माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कवडे यांनी दिली.

जिल्ह्यात ग्रामीण भागात कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून उपचार दिले जात आहेत. तिथे आवश्यक खाटा आहेत. मात्र, गंभीर रुग्णांना शहरात यावे लागत असून, त्यांना खाटा उपलब्ध करुन देण्यात अडचणी निर्माण होत असल्याचेही ते म्हणाले. ग्राम दक्षता समितीचे अध्यक्ष सरपंच असून, सचिव ग्रामसेवक, सरपंचाच्या मदतीला या समितीत मुख्याध्यापक, शिक्षक, पोलीसपाटील, आशाताई, अंगणवाडी सेविका, कृषिसेवक, बीएलओ आदी कर्मचा-यांचाही समावेश केला आहे. कामात हलगर्जीपणा करणा-या कर्मचा-यांवर साथरोग नियंत्रण कायदे आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल. त्यांच्या अपात्रतेचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांना सादर करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

 

ऑक्सीजन उत्पादनासाठी रिलायन्स इंडस्ट्रीजचा पुढाकार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या