औरंगाबाद : घाटी रुग्णालयाला औषधांसाठी सरकारतर्फे कोट्यवधी रुपये मिळतात. असे असताना रुग्णांना बाहेरून औषधी विकत आणावी लागत आहे. या माध्यमातून गरीब रुग्णांची लूट करण्यात येत आहे. हा गोरखधंदा घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्यासमोर सुरू आहे, असा गंभीर आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी शुक्रवारी (ता. २७) पत्रकार परिषदेत केला.
औरंगाबादच्या घाटी रुग्णालयामध्ये एक महिला प्रसूत झाली. तिच्या पतीला औषधासह मास्क, सॅनिटायझर, हॅन्डग्लोज अशा जवळपास सात हजार रुपयांच्या औषधी बाहेर आणण्यास सांगितले, असा आरोप देखील जलील यांनी केला आहे. त्यांच्यासोबत या पत्रकार परिषदेला सदरील महिलेचे पती शिवकुमार मुंडे हे देखील उपस्थित होते.
एकीकडे अधिष्ठाता अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये घाटी रुग्णालयात मुबलक औषधे असल्याचं सांगतात, तरीही रुग्णांना बाहेरुन औषधे का मागवता आणि एजंटच्या माध्यमातून रक्त आणण्यासाठी का लावले जाते. याची चौकशी करण्याची मागणी देखील जलील यांनी केली आहे. यास जबाबदार असलेल्या डॉ. येळीकर यांना तत्काळ निलंबित करावे, अशी मागणीही त्यांनी केली.
शिवकुमार मुंडे म्हणाले, की २२ तारखेला माझ्या पत्नीला घाटीत दाखल केले. त्यानंतर त्यांनी आम्हाला ब्लडची ऑर्डर देण्याचे सांगितले. आम्ही ऑर्डर दिली नाही. त्यामुळे डॉक्टरांनी खासगी लॅबवाल्याला फोनवर पुन्हा विचारणा केली. त्याचा एक एजंट आमच्याकडे आला व माझ्या मित्राला नेत एकूण २९०० रुपये घेऊन दोन रक्ताच्या बॅग दिल्या. त्याची पावती दिली नाही. त्यानंतर १४७० रुपयांची औषधी आणण्यास सांगितले. पुन्हा तीनशे रुपयांची औषधी लिहून दिली. आज सुटी देताना चारशे रुपयांची औषधी साध्या चिठ्ठीवर लिहून दिली. हे मेडिकल रुग्णांसाठी नसून ते आम्हाला रेकॉर्डसाठी दाखवावे लागते, असे नर्सने सांगितले व चारशे रुपयांची आणलेली सर्व औषधे-मेडिकल त्यांच्यापाशी ठेवून घेतले.
Read More पोलिस करताहेत सुशांतच्या अर्थिक व्यवहारांचाही तपास