औरंगाबाद : अवैद्य गर्भपात प्रकरण उघडकीस आल्याने औरंगाबाद येथे एकच खळबळ उडाली आहे. पैठण तालुक्यातील बिडकीन येथील रुग्णालयात गेल्या तीन ते चार वर्षांपासून अवैधरित्या गर्भपात करण्यात येत असल्याचे समोर आले. यानंतर दवाखाना चालवणा-या डॉक्टर दाम्पत्याविरोधात बिडकीन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनाली उद्धव काळकुंबे आणि अमोल जाधव असे गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरांचे नाव आहे.
डॉ. अमोल जाधव हे गेल्या तीन ते चार वर्षांपासून पैठण तालुक्यातील बिडकीन येथे स्त्रीरोग रुग्णालय चालवतात. दरम्यान, एका महिलेचा या रुग्णालयात अवैधरित्या गर्भपात करण्यात आला. मात्र, त्या दरम्यान महिलेला अतिरिक्तस्त्राव झाल्याने तिला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथे डॉक्टरांनी महिलेला दाखल करून न घेतल्याने तिला औरंगाबादच्या शासकीय घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. या प्रकरणात आरोपी डॉक्टर दाम्पत्याकडे डॉक्टर असल्याचा परवाना नसल्याचे समोर आले आहे. यामुळे जिल्हा आरोग्य विभाग काय करत होते, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
घाटीतील रुग्णालयाच्या पत्रावरून बिडकीन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे औरंगाबाद येथील ग्रामीण भागात छुप्या पद्धतीने का होईना डॉक्टर अधिकच्या पैशासाठी गर्भवती महिलांच्या जीवाशी खेळ करत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी आरोपी डॉक्टर दाम्पत्याला अद्याप अटक केलेली नाही. हे दाम्पत्य फरार आहे. या डॉक्टर दाम्पत्याच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे.