22.8 C
Latur
Sunday, June 26, 2022
Homeऔरंगाबादऔरंगाबादमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक

औरंगाबादमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : रिक्षात मद्यपान करणा-यांना हटकल्यावरून सुरू झालेला वाद विकोपाला गेल्याने औरंगाबाद शहरात दोन गटांमध्ये तुफान दगडफेक झाल्याची घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली आहे. या दगडफेकीत अनेक जण जखमी झाले असून दोन्ही गटांतील २० ते २५ जणांवर सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

एकमेकांवर दगडफेक करताना हिंसक झालेल्या जमावाने दुचाकी आणि रिक्षाची तोडफोड केली. या प्रकरणात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय हिवाळे, हरिश ऊर्फ नक्का मारोती साळुंके,आदी राजू हिवराळे, अरबाज आणि सय्यद बासीत, अख्तर, नासेर, जावेद आणि इतर १० ते १५ जणांवर (सर्व रा. फाजलपुरा, लेबर कॉलनी, औरंगाबाद) गुन्हा दाखल करण्यात आला. हिराबाई राजू हिवराळे (वय-४५ वर्षे, रा. फाजलपुरा, मनपा शाळेशेजारी), सय्यद बासीत सय्यद हसन (वय- ४२ वर्षे, रा. फाजलपुरा, लेबर कॉलनी) अशी जखमींची नावे आहेत.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, शुक्रवारी रात्री सय्यद बासित यांच्या घरासमोर एका रिक्षामध्ये चार जण मद्यपान करत होते. त्यांना बासित यांनी विरोध करत हटकले. यावरून वाद सुरू झाला आणि नंतर लाठ्या-काठ्या घेत दोन गट भिडले. यावेळी दोन्ही गटांकडून मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत अनेकजण जखमी झाले आहेत, तर एक रिक्षा आणि एका दुचाकीची तोडफोड करण्यात आली आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सिटीचौक पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी जमावाला पांगवत परिस्थिती नियंत्रणात आणली. रात्री उशिरा दोन्ही गटांमधील २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले असून काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या