जालना : औरंगाबादेतून निवडून आल्यावर आता औरंगाबादचे खरे नाही, अशी भीती लोकांमध्ये पसरवण्यात आली होती. पण कामातून आम्ही औरंगाबादमधील सर्व जाती-धर्माच्या लोकांची मने जिंकण्यात यशस्वी झालो, असे खासदार इम्तियाज जलील म्हणाले.
जालना येथील ईद स्नेहमिलन आणि सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे जलील म्हणाले, गेल्या निवडणुकीत पाच हजार मतांनी विजयी झालो. येत्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ५० हजार मतांची आघाडी घेऊन निवडून येऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कोणासाठी दंगल फायद्याची नाही. औरंगाबादमध्ये २०१७ मध्ये दंगल झाली. त्यात अनेकांची दुकाने जाळण्यात आली. ती विविध जाती-धर्माच्या लोकांची होती. एमआयएमने सर्व दुकाने उभी करण्यास मदत केली.
जालन्यातील सत्कार आणि एमआयएमला मिळत असलेल्या प्रतिसादाने भारावून गेलो असून पक्षाच्या अध्यक्षांनी आदेश दिला तर जालन्यातूनच निवडणूक लढवू, अशी इच्छा जलील यांनी याप्रसंगी व्यक्त केली.