26.6 C
Latur
Friday, November 7, 2025
Homeमहाराष्ट्रधमकी देऊन बाळूमामा देवस्थानचे इतिवृत्त बदलले

धमकी देऊन बाळूमामा देवस्थानचे इतिवृत्त बदलले

मंदिराचे लेखनिक यांची तक्रार

गारगोटी : आदमापूर (ता. भुदरगड) येथील बाळूमामा देवालय न्यासाचे इतिवृत्त जिवे मारण्याची धमकी देत बेकायदेशीररीत्या बदलायला लावल्याची तक्रार मंदिराचे लेखनिक अरविंद गणेश स्मार्त यांनी केली आहे. संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार अर्जातून बुधवारी केली. या तक्रारीच्या प्रती त्यांनी गृहमंत्री, पालकमंत्री, धर्मादाय आयुक्त-मुंबई, धर्मादाय सहआयुक्त-कोल्हापूर, बाळूमामा देवालय अध्यक्ष, विश्वस्त यांना दिल्या आहेत.

तक्रारीत म्हटले आहे, आदमापूर येथील बाळूमामा मंदिर येथे मी लेखनिक आहे. सोमवार (दि. २७) सुट्टी असताना दुपारी दोनच्या सुमारास विश्वस्त सरपंच विजय गुरव यांनी मला फोन करून मीटिंगची नोटीस पोस्टामधून टाकायची आहे असे सांगून गारगोटी बसस्थानकावर येण्यास सांगितले. त्यावेळी बाळूमामा देवालय समितीचे कार्याध्यक्ष लक्ष्मण होडगे यांच्या गाडीतून सरपंच गुरव आले. त्यांनी मला चहा पिण्याचे निमित्त करून गाडीत बसवून कडगाव रस्त्यावर नेले. त्यानंतर मित्राने जेवण केले आहे, असे सांगून फये येथील रिसॉर्टवर नेले. त्यानंतर तेथे आनंदा पाटील, विनायक पाटील, नामदेव पाटील, मारुती पाटील हे सर्व आले. मला विजय गुरव यांनी इतिवृत्त बदलण्यास सांगितले.

त्यावेळी हे बेकायदेशीर असून मला तसे करता येणार नाही, असे मी त्यांना सांगितले; पण त्यांनी मला जिवे मारण्याची धमकी देत आर्थिक व्यवहारांची जबाबदारी तुझ्यावर टाकीन असे धमकावत इतिवृत्तामधील एक पान काढून माझ्यासमोर पान क्रमांक बदलले व इतिवृत्त बदलण्यास भाग पाडले. त्यानंतर त्यांनी मला आकुर्डे-गारगोटीदरम्यान रस्त्यावर सोडले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR