26.4 C
Latur
Tuesday, January 13, 2026
Homeमहाराष्ट्रबंडोबा आक्रमक

बंडोबा आक्रमक

संभाजीनगर भाजपमध्ये नाराजांचा पुन्हा राडा मुंबईत ठाकरे गटात मोठी बंडखोरी मातोश्रीच्या अंगणातही फडकले बंडाचे निशाण

मुंबई : प्रतिनिधी
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी उमेदवारी न मिळाल्याने सर्वच राजकीय पक्षांमध्ये असंतोषाचा उद्रेक झाला असून सलग दुस-या दिवशी याचे पडसाद उमटले. संभाजीनगरमध्ये नाराज इच्छुकांनी मंत्री अतुल सावे व भागवत कराड यांना घेराव घालून अक्षरश: शिवीगाळ केली. तर भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमध्ये भाजपच्या ४० पदाधिका-यांनी राजीनामे दिले आहेत. मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेलाही बंडाळीचा मोठा फटका बसला असून, उद्धव ठाकरेंचे मातोश्री निवासस्थान असलेल्या प्रभाग क्रमांक ९५ मध्ये विद्यमान नगरसेवक चंद्रशेखर वायंगणकर यांनी बंडखोरी केली आहे. बंडोबांची समजूत काढण्यासाठी नेत्यांची धावाधाव सुरू असून शुक्रवारपर्यंत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न आहे.

कोविडचे संकट व ओबीसी आरक्षणाच्या पेचामुळे जवळपास पाच वर्षे सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या. ब-याच प्रतीक्षेनंतर जाहीर झालेल्या या निवडणुकीत उतरण्यासाठी सर्वच पक्षांमध्ये कार्यकर्त्यांची झुंबड उडाली आहे. शेवटच्या क्षणापर्यंत चाललेल्या युती व आघाडीच्या चर्चा, बंडखोरी रोखण्यासाठी उमेदवारांची यादी जाहीर न करता थेट एबी फॉर्म देण्याची रणनीती यामुळे अनेकजण शेवटपर्यंत आशेवर होते. त्यामुळे ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांच्या संतापाचा उद्रेक झाला आहे. काल सर्वच महापालिकेत नाराजीचा वणवा भडकला होता. ही नाराजी कमी होण्याऐवजी आज पुन्हा त्याचे पडसाद उमटले.

मुंबईत सर्वच राजकीय पक्षांना बंडाळीचा तडाखा बसला आहे. विशेषत: मनसेसोबत युती केल्याने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला अनेक ठिकाणी उद्रेकला सामोरे जावे लागले. वरळी, माहीम, दादर भागात तर याचे पडसाद उमटलेच पण मातोश्रीच्या अंगणातही बंडखोरी झाली आहे. प्रभाग क्रमांक ९५ मध्ये विद्यमान नगरसेवक चंद्रशेखर वायंगणकर यांचे तिकीट कापून माजी आमदार श्रीकांत सरमळकर यांचे जावई हरी शास्त्री यांना उमेदवारी दिल्याने वायंगणकर यांनी बंडखोरी केली आहे. मनसे आणि ठाकरे गटाच्या जागावाटपामूळ मुंबईतील ८ प्रभागांमध्ये मातब्बर बंडखोर रिंगणात उतरले आहेत. ही बंडखोरी शमवण्यासाठी दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांकडून प्रयत्न सुरू आहेत.

परप्रांतीयाला तिकीट, मग मराठी महापौर कसा?
हरी शास्त्री हे दिवंगत आमदार श्रीकांत सरमळकर यांचे जावई आहेत. हा जावई आला कुठून, सर्वसामान्य शिवसैनिकांनी काय करायचे? मराठी माणसाला तुम्ही तिकीट डावलून तुम्ही परप्रांतीयला देणार आणि म्हणणार महापौर मराठी होणार? असा संतप्त सवाल वायंगणकर यांनी केला. पक्ष संकटात असताना अनेक ऑफर आल्या, पण आम्ही पैशांपेक्षा निष्ठा स्वीकारली आणि या आम्हाला हे निष्ठेचे फळ मिळाले, हे दुर्देवी आहे, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली. आपण कुठल्याही परिस्थितीत अर्ज मागे घेणार नाही आणि ही जागा निवडून आणून, पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत जाणार असे वायंगणकर म्हणाले.

संभाजीनगर भाजपात राडा, ठाकरे सेनेलाही तडा
संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी न मिळाल्याने भाजपामधील नाराजांनी काल जोरदार राडा केला होता. आजही हा संताप पहायला मिळाला. भाजपाचे मंत्री अतुल सावे व भागवत कराड यांच्या गाड्या रोखून असंतुष्ठानी त्यांना शिव्यांची लाखोली वाहिली. त्यांच्यासमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांनी सावे आणि कराड यांची कार्यकर्त्यांच्या गराड्यातून सुटका केली.

उमेदवारीवरून फुट
संभाजीनगरमध्ये शिवसेनेच्या ठाकरेगटातही उमेदवारीवरून फूट पडली आहे. माजी मंत्री व पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी अंबादास दानवे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. निवडून येण्याची क्षमता असलेल्या लोकांची तिकिटं कापून अंबादास दानवे यांनी भाजपला मदत केल्याचा आरोप खैरे यांनी केला आहे. काँग्रेसमधून आलेल्या माजी महापौर अब्दुल रशिद खान उर्फ मामू यांना अंबादास दानवे यांनी उमेदवारी मिळवून दिली आहे. आपण त्यांच्या प्रचाराला जाणार नसल्याचे खैरे यांनी सांगितले.

नागपुरातही भाजपला बंडखोरीचा फटका
भाजपच्या बालेकिल्ला असलेल्या नागपुरातही भाजप समोर बंडखोरांनी आव्हान उभे केले आहे. उमेदवार जाहीर झाल्यानंतर नागपुरमधील ४० हुन अधिक पदाधिका-यांनी राजीनामे दिले आहेत. अनेकांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवार बंडखोरी केली आहे. तब्बल सहा टर्मचे नगरसेवक असलेल्या सुनील अग्रवाल यांनी प्रभाग १४ मधून बंडखोरी केली आहे. माजी महापौर अर्चना डेहनकर यांचे पती विनायक डेहनकर यांनीही राजीनामा दिला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR