21.6 C
Latur
Sunday, December 8, 2024
Homeराष्ट्रीयबंगळुरू भारतातील सर्वाधिक रोजगार देणारे शहर

बंगळुरू भारतातील सर्वाधिक रोजगार देणारे शहर

मुंबई : प्रतिनिधी
नोक-यांबाबत बंगळुरू आजही रोजगार संधी आणि वेतनवाढ देणारे भारताचे सर्वोच्च शहर म्हणून वर्चस्व गाजवत आहे. येथे मागील वर्षाच्या तुलनेत ९.३ टक्के वृद्धी निदर्शनास आली असून ही वाढ टेक्नॉलॉजी आणि व्यवसायाचे केंद्र म्हणून बंगळूरची जुनी ख्याती अधोरेखित करते. बंगळूरमधील सरासरी मासिक वेतन २९,५०० रुपये आहे. ही बाब भारताचा आघाडीचा स्टाफिंग समूह टीमलीझ सर्व्हिसेसच्या ‘जॉब्स अँड सॅलरीज प्राइमर रिपोर्ट’मधून निदर्शनास आली.

या अहवालाने हंगामी आणि स्थायी नियुक्ती बाजारपेठांमधील एकीकृत वेतनाचे विश्लेषण करून निवडक शहरे आणि उद्योगांतील कल कसा आहे याबाबत महत्त्वपूर्ण माहिती प्रदान केली आहे. बंगळूर पाठोपाठ चेन्नई आणि दिल्लीचा क्रमांक येतो. येथे अनुक्रमे ७.५ टक्के आणि ७.३ टक्के इतकी मजबूत पगारवाढ आहे. यामधून या रोजगार बाजारपेठांचे स्पर्धात्मक स्वरूप दिसून येते.

चेन्नईमधील सरासरी मासिक वेतन २४,५०० रुपये असून दिल्लीत ते २७,८०० रुपये इतके आहे. मुंबई आणि अहमदाबाद येथेदेखील स्थिर वेतनवाढ दिसून आली, ज्यामधून प्रमुख रोजगार केंद्रे म्हणून त्यांचे महत्व पक्के होते. मुंबईतील सरासरी वेतन २५,१०० रुपये आहे तर पुण्याचे सरासरी वेतन २४,७०० रुपये असून त्यांनी आपली स्पर्धात्मक वेतन पातळी सांभाळली. या शहरांमध्ये वेतनवाढ ४ टक्के ते १० टक्के या श्रेणीत आहे. उद्योग आघाडीवर ८.४ टक्के वेतनवाढीसह सर्वश्रेष्ठ कामगिरी ‘रिटेल’ने केली आहे. हाच कल कन्झ्युमर ड्यूरेबल्स (५.२ टक्के) आणि बँकिंग आणि इतर सेवांमध्येही (५.१ टक्के) दिसून येतो. तसेच या दोन्हींत व्यावसायिकांसाठी वृद्धीच्या दमदार संधी दिसत आहेत. दुसरीकडे लॉजिस्टिक्स, एफएमसीजी, हेल्थकेअर आणि फार्मा, बांधकाम आणि रियल इस्टेट यांसारख्या क्षेत्रांत सामान्य वृद्धी दिसली. जी कुशल व्यावसायिकांसाठीची त्यांची स्थिर मागणी दाखवते.

हा अहवाल भारतातील रोजगार मार्केटमधील सकारात्मक चलन अधोरेखित करतो आणि विविध शहरे आणि उद्योगांत लक्षणीय पगारवाढ दर्शवितो. बंगळूरमधील ९.३ टक्के वेतनवाढ आणि रिटेलमधील दमदार ८.४ टक्के वाढ विशिष्ट कौशल्यांच्या वाढत्या मागणीकडे निर्देश करते. यामधून केवळ वेतन वृद्धीतील वाढ दिसत नाही, तर रोजगार मार्केटमध्ये होत असलेल्या सखोल बदलाचा अंदाजही येतो, असे टीमलीज सर्व्हिसेसच्या स्टाफिंग विभागाचे सीईओ कार्तिक नारायण म्हणाले.

टेलिकम्युनिकेशन्स, इन्फ्रास्ट्रक्चर आघाडीवर
सर्वाधिक वेतन देणा-या उद्योगांमध्ये टेलिकम्युनिकेशन्स (२९,२०० रुपये), उत्पादन, इंजिनियरिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर (२८,२०० रुपये), हेल्थकेअर आणि फार्मा (२७,६०० रुपये) आणि बांधकाम आणि रियल इस्टेट (२७,००० रुपये) यांचा समावेश आहे.

रोजगार मार्केट बदलते
भारताचे रोजगार मार्केट सतत बदलत आहे आणि २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठीचा ‘जॉब्स अँड सॅलरीज प्राइमर रिपोर्ट’ बँकिंग आणि अन्य कन्झ्युमर ड्युरेबल्स आणि एफएमसीजीसारख्या क्षेत्रांत विशिष्ट कौशल्यांची लवचिक मागणी, वेगवेगळ््या नोक-यांंमधील गतिशील वेतनवाढ आणि व्यावसायिकांसाठी अधिक उज्ज्वल भविष्य दर्शवितो.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR