नोएडा : घरात चोरी होऊ नये म्हणून लोक रोख रक्कम, मौल्यवान दागिने बँकेत ठेवतात. अनेक जण भविष्याचा विचार करून बँकेत मुदत ठेवी ठेवतात. मात्र तुम्ही ज्या बँकेत मोठ्या विश्वासाने पैसे ठेवले त्याच बँकेतील कर्मचा-यांनी त्याच्यावर डल्ला मारला तर काय? हादरवून सोडणारा असाच प्रकार पंजाब नॅशनल बँकेत घडला आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या ग्रेटर नोएडातील अचेर शाखेत शेतक-यांच्या खात्यांमधून तब्बल १२ कोटी रुपयांहून अधिक रक्कम परस्पर हस्तांतरित केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
बचत खात्यांसह मुदत ठेवींमधील रक्कम खातेदारांच्या संमतीशिवाय काढून घेतल्याचा आरोप शेतक-यांनी केला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत बँकेच्या अचेर शाखेतील शाखा व्यवस्थापकासह सर्व कर्मचा-यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच, या कथित आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आली असून बँकेकडूनही अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१६(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती ग्रेटर नोएडाचे सहाय्यक पोलिस आयुक्त संचित शर्मा यांनी दिली.
नेमके प्रकरण काय?
गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील सेक्टर पाई-१ परिसरातील अचेर गावाजवळ असलेल्या या बँक शाखेतून पैसे काढण्यासाठी गेलेल्या खातेदारांना त्यांच्या खात्यांमध्ये अपेक्षित रक्कम नसल्याचे समजल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्यानंतर संतप्त शेतक-यांनी मंगळवारी बँकेच्या शाखेबाहेर आंदोलन केले. त्यांच्या बचत खात्यांमधील पैसे तसेच जमिनीच्या संपादनापोटी मिळालेली नुकसानभरपाईची रक्कम परस्पर काढून घेतल्याचा आरोप त्यांनी केला. बुधवारी या प्रकरणातील तक्रारदारांची संख्या २५ वर पोहोचल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आईच्या नावावरील ८० लाखांची रक्कम गायब
अचेर येथील अमरपाल यांनी या प्रकरणाबाबत गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी आपली आई सुनीता देवी यांच्या नावावर अनुक्रमे ४० लाख, ३० लाख आणि १० लाख रुपयांच्या अशा तीन मुदत ठेवी ठेवल्या होत्या. याशिवाय, नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीच्या मोबदल्यातून मिळालेल्या सुमारे १२ लाख रुपयांची रक्कम त्यांनी आईच्या बचत खात्यात जमा केली होती. १० लाख रुपयांची मुदत ठेव मुदत संपल्यानंतर काढण्यासाठी ते २२ ऑक्टोबर रोजी बँकेत गेले होते. मात्र, त्यांना २७ ऑक्टोबर रोजी पुन्हा येण्यास सांगण्यात आले. त्यानंतर बँकेत चौकशी केली असता त्यांच्या मुदत ठेवीमध्ये कोणतीही रक्कम शिल्लक नसल्याचे सांगण्यात आले. बँकेचे विवरणपत्र तपासले असता १६ जून रोजी मुदत ठेवी मुदतीपूर्वीच बंद करून त्यातील पैसे अन्यत्र हस्तांतरित करण्यात आल्याचे दिसून आल्याचा दावा त्यांनी केला. याशिवाय, आईच्या बचत खात्यातील आणखी १० लाख रुपयेही परस्पर हस्तांतरित करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
बँकेकडून पैसे परत करण्याचे आश्वासन
गौतम बुद्ध नगर जिल्ह्याचे अग्रणी बँक व्यवस्थापक राम विनोद कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार हस्तांतरित झालेली रक्कम पंजाब नॅशनल बँकेच्या दिल्लीतील मुख्य कार्यालयाने रोखून धरली आहे. ही रक्कम संबंधित खातेदारांना परत करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. शाखा व्यवस्थापकासह सर्व कर्मचा-यांचे निलंबन करण्यात आले असून सीबीआयकडून या कथित गैरव्यवहाराची चौकशी केली जाणार आहे. बँकेने स्वतंत्र अंतर्गत चौकशीही सुरू केली आहे.
















