नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन केले. यावेळी, बापू ही केवळ एक व्यक्ती नाही, तर एक असा विचार आहे, जो कधीही नष्ट केला जाऊ शकत नाही. कारण गांधी भारताच्या आत्म्यात अमर आहेत असे म्हणत राहूल गांधी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
राहुल गांधी एक्सवर पोस्ट करत म्हणाले महात्मा गांधी एक व्यक्ती नाही, एक विचार आहे. असा विचार, जो कधी ब्रिटीश साम्राज्याने, कधी द्वेषाच्या विचाराने तर कधी अहंकारी सत्तेने नष्ट करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. राष्ट्रपित्याने आपल्याला स्वातंत्र्यासोबतच एक मूलमंत्र दिला, सत्तेच्या ताकदीपेक्षा सत्याची शक्ती मोठी असते आणि हिंसा व भयापेक्षाही अहिंसा आणि साहस मोठा असतो. ही विचार नष्ट होऊ शकत नाही. कारण गांधी भारताच्या आत्म्यात अमर आहेत.
यावेळी, काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी १९४८ मधील सरदार वल्लभभाई पटेल आणि शामा प्रसाद मुखर्जी यांच्यातील पत्रव्यवहाराचा संदर्भ दिला. गांधीजींच्या हत्येपूर्वी पंडित नेहरूंनी आणि त्यानंतर १८ जुलै १९४८ रोजी सरदार पटेलांनी मुखर्जींना एक पत्र लिहिले होते, स्वत:ला राष्ट्रवादाचे रक्षक म्हणवणा-यांसंदर्भात या पत्रात गंभीर आरोप आहेत, असे रमेश यांनी स्पष्ट केले. दरम्यान, भाजपचे खासदार अभिजीत गंगोपाध्याय यांच्या गांधी आणि गोडसे यांच्यात निवड करू शकत नाही या विधानाचा समाचार घेत, ही मानसिकता बरेच काही स्पष्ट करते, असेही रमेश यांनी म्हटले आहे. आपल्या पोस्टसोबत रमेश यांनी नेहरूंनी गांधीजींच्या हत्येनंतर राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणाची लिंकही त्यांनी यावेळी शेअर केली.

