बीड : ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत. जाहीर झालेल्या ९२ नगरपालिकांची निवडणूक प्रक्रिया थांबवावी, अशी मागणी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आयोगाशी चर्चा करावी, अशीही मागणी त्यांनी केली.
सुप्रीम कोर्टात आज ओबीसी आरक्षणासंदर्भात झालेल्या सुनावणीमध्ये कोर्टाने नवीन निवडणुकांची घोषणा न करण्याचे निर्देश दिले आहेत. यावर पंकजा मुंडेंनी समाधान व्यक्त केले. पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘सुप्रीम कोर्टाकडून सकारात्मक निर्णय येईल, अशी अपेक्षा आहे. ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्याचे आदेश कोर्टाने दिले, तेव्हाच ओबीसी समाजाला न्याय मिळेल. सध्या राज्यात ९२ नगर परिषदांच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय होणा-या या निवडणुका ओबीसी समाजावर मोठा अन्याय आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी
राज्यात ओबीसी आरक्षणाशिवाय काही नगर परिषदांच्या निवडणुका होत आहेत, त्यांची प्रक्रिया तातडीने थांबवावी, अशी मागणी पंकजा मुंडेंनी केली. मुंडे म्हणाल्या, ‘ओबीसी आरक्षण मिळाल्यानंतर या निवडणुका व्हायला हव्यात. तोपर्यंत या निवडणुकांची प्रक्रियाही थांबवावी. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आयोगाशी चर्चा करावी. यासंदर्भात मी दोघांशीही चर्चा केली आहे. त्यामुळे ओबीसी समाजाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे.
कुठलीही तडजोड नको
ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारने कुठलीही तडजोड करू नये. कोणत्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणाशिवाय होणा-या निवडणुका स्थगित कराव्यात, अशी मागणी पंकजा मुंडेंनी केली.