24.6 C
Latur
Monday, January 18, 2021
Home बीड स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ कार्यान्वित करा -धनंजय मुंडे

स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ कार्यान्वित करा -धनंजय मुंडे

एकमत ऑनलाईन

मुंबई : लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची रचना, घटना इत्यादीचा आकृतिबंध तयार करून महामंडळ कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने तातडीने कारवाई करावी. तसेच ऊसतोड कामगारांची नोंदणी प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात यावी, असे निर्देश सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मंगळवारी दिले.

ऊसतोड मजुरांची नोंदणी १५ दिवसात करण्याचे निर्देश

धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आज ऊसतोड कामगार कल्याण मंडळाबाबत बैठक पार पडली. बैठकीत उसतोडणीचा हंगाम येत्या काही दिवसात सुरू होत असून, कामगारांची सरकारकडे नोंद करून त्यांना ओळखपत्र देणे, आरोग्य तपासणी करणे तसेच ऊसतोड कामगार, त्यांच्या पशूंना आरोग्य विमा उपलब्ध करून देणे हे प्राथमिक उद्दिष्ट साध्य करण्यासंबंधी चर्चा झाली. महामंडळाची रचना कशी असावी, घटना, आकृतीबंध तयार करणे, महामंडळाचे स्वतंत्र कार्यालय, कर्मचारी, महामंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी या सर्वच विषयांवर बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. महामंडळाच्या माध्यमातून कंपनी कायद्याच्या अंतर्गत ऊसतोड मजुरांची नोंदणी १५ दिवसात करण्याचे निर्देश यावेळी मुंडे यांनी दिले.

कल्याणकारी योजना राबविण्याचा आपला मानस

उसतोड कामगारांच्या आर्थिक उत्कर्षासाठी, त्यांच्या कौटुंबिक सुरक्षेसाठी महामंडळाच्या माध्यमातून काही कल्याणकारी योजना राबविण्याचा आपला मानस असून यासाठी त्याद्वारे निधी उभा करण्यासाठी सहकार विभागासोबत चर्चा सुरू असल्याचे मुंडे यावेळी म्हणाले. अर्थसंकल्पातील तरतुदीप्रमाणे महामंडळासाठी निधी उभा करण्यासाठी आपण स्वत: प्रयत्न करणार असून, ऊसतोड मजूर, मुकादम, वाहतूकदार यांना माथाडी कामगार कायद्याप्रमाणे कायदा लागू करण्यासाठीही आपण पाठपुरावा करणार असल्याचेही धनंजय मुंडे यांनी सांगितले.

महामंडळ व घटना समितीत ऊसतोड कामगार, मुकादम यांना स्थान देणार
विभागाचे अधिकारी यांच्यासह साखर कारखाना प्रतिनिधी, प्रत्यक्ष ऊसतोड कामगार, मुकादम व विविध संघटना यांचे प्रतिनिधी यांना महामंडळ व घटना समितीमध्ये स्थान द्यावे, महामंडळ स्थापनेमध्ये त्यांना विश्वासात घ्यावे, अशा सूचना यावेळी मुंडेंनी अधिका-यांना दिल्या.

ऊसतोड कामगारांच्या मुलींसाठी निवासी शाळा
ज्या तालुक्यांमध्ये ऊसतोड कामगारांची संख्या सर्वाधिक आहे, असे पाच तालुके निवडून तेथे ऊसतोड कामगारांच्या मुलींसाठी स्वतंत्र पाच निवासी शाळा उभारण्यात येतील. याद्वारे मुलींना मोफत शिक्षण, सामाजिक सुरक्षा उपलब्ध करून देण्यासाठी निधी तसेच अन्य बाबी उभ्या करण्याची जबाबदारी स्वत:कडे घेतली असल्याचेही मुंडे यांनी बैठकीत जाहीर केले.

गरज बळकटीची

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या