22.5 C
Latur
Saturday, November 26, 2022
Homeबीडकोणासमोरही झुकणार नाही : पंकजा मुंडे

कोणासमोरही झुकणार नाही : पंकजा मुंडे

एकमत ऑनलाईन

सावरगाव : मी संघर्षाला घाबरत नाही. छत्रपती शिवरायांचा पराक्रम आणि भगवानबाबांची सात्विकता आणि मुंडे साहेबांचा संघर्ष हीच माझी ओळख असल्याचे मत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले. मी थकणार नाही, थांबणार नाही आणि कधीही कोणासमोर झुकणार नाही, असेही त्या म्हणाल्या.छत्रपती संभाजीराजेंचा आदर्श माझ्यासमोर आहे. त्यामुळे मी संघर्ष करत राहणार असल्याचे मुंडे यावेळी म्हणाल्या.

मी आता कोणतीही अपेक्षा करणार नाही. मी आता २०२४ च्या निवडणुकीच्या तयारीला लागली असल्याचे पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. भगवान भक्तीगड सावरगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे बोलत होत्या. माझे लोक म्हणजे समुद्र आहे. समुद्राला बांधणे शक्य नसल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. जर कोणी समाजात भिंती उभ्या करण्याचा प्रयत्न केला, तर त्याला क्षमा करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

लोकांना प्रेम नाही दिले तर खुर्च्या रिकाम्या राहतील. आता माझ्याकडे कोणतेही पद नाही. देवेंद्र फडणवीसांनी २०१९ मध्ये महाजनादेश यात्रा काढली होती, त्यावेळी सभा घेण्यासाठी मी महाराष्ट्रभर फिरले. आता हे लोक माझी ताकद वाढवण्यासाठी आले आहेत. ज्या मुशीतून आमचे नेते आले त्याच मुशीतून मी आले आहे. आमच्यात व्यक्ती श्रेष्ठ नाही, तर संघटन हेच श्रेष्ठ असल्याचे पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.

मी कोणावरही नाराज नाही. मी का नाराज होऊ, असेही मुंडे यावेळी म्हणाल्या. मोठ-मोठ्या लोकांना राजकारणात संघर्ष करावा लागला आहे. योग्य वेळेची वाट बघा, असेही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. मी आता २०२४ च्या तयारीला लागली आहे. मला कोणताही गर्व नाही, मी स्वाभिमानी आहे. मी तुम्हाला असत्य कधीही बोलणार नाही. सत्य कधीही पराजित होत नाही, असेही त्या म्हणाल्या.

मी कधीही मागायला जाणार नाही
आता मी २०२४ ला पक्षाने तिकीट दिले तर तयारीला लागणार आहे. मला कोणत्याही नेत्याबद्दल काही बोलायचे नाही. आम्ही कमळाशिवाय दुस-या बटणाला कधीही स्पर्श केला नाही, हे सांगताना पंकजा भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले. मी कधीही कोणासमोर काही मागायला जाणार नाही. मी कधीही उतणार नाही, मातणार नाही, आणि घेतला वसा टाकणार नाही. मी तुमच्यासोबत काम करणार आहे, असेही मुंडे म्हणाल्या.

२०२४ ला स्वाभिमानाची ताकद दाखवू
एकदा आपण समर्पण केले. २०२४ ला निवडणूक आहे. समर्पणाची ताकद आपण दाखवून देऊ. ज्योतीतून यज्ञ आणि थेंबातून समुद्र दाखवून देऊ. स्वाभीमानाची ताकद दाखवून देऊ. ठिक आहे पदर पसरून कुणाकडे काही मागायला जाणार नाही, असेही पंकजा म्हणाल्या.

मेळाव्यानंतर गोंधळ
भगवान भक्तीगडावरील मेळाव्यात पंकजा मुंडेंच्या भाषणानंतर गोंधळ झाल्याची घटना घडली. भाषण झाल्यानंतर पंकजा मुंडेंना समर्थकांनी गराडा घातला. यावेळी सुरक्षेची परिस्थिती निर्माण झाल्याने पोलिसांनी हस्तक्षेप केला. त्यामुळे समर्थक आणि पोलिसांत तणावाची स्थिती निर्माण झाली. त्यामुळे पोलिसांनी कार्यकर्त्यावर लाठीचार्ज केला.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या