बंगळुरू : बेळगाव हा कर्नाटकचा अविभाज्य भाग आहे. ते कधीच महाराष्ट्रात विलीन होणार नाही, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले. कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादावर महाजन समितीने दिलेल्या अहवालातील निष्कर्ष हे अंतिम आहेत. त्यामुळे बेळगाव प्रश्नावर आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही असेही त्यांनी सांगितले. सिद्धरामय्या म्हणाले की, बेळगावच्या प्रश्नावर महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला असला तरी आम्ही बेळगाव कोणालाही देणार नाही, ते कर्नाटकचे अविभाज्य अंग आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले की, पूर्वी महाराष्ट्र एकीकरण समितीचे पाच आमदार निवडून येत असत. परंतु, आता त्यांची संख्या शून्यावर आली आहे. या समितीचे लोकही कन्नडिगच आहेत. मात्र, कोणी गुंडगिरी केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.

