लातूर : प्रतिनिधी
देशभरातील बहुचर्चित नीट पेपर लीक व फसवणूक प्रकरणी लातुरातील दाखल गुन्ह्यातील फरार आरोपी इरन्ना कोनगुलवार हा पोलिसांबरोबरच नीट प्रकरणात देशभरात ४० जणांना गजाआड करणा-या सीबीआयला गुंगारा देत आहे. दुसरीकडे फरार इरन्नाने जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज फेटाळल्यानंतर छत्रपती संभाजीनगर खंडपीठाच्या उच्च न्यायालयात धाव घेतली असून त्यावर प्रलंबित असलेली सुनावणी सोमवार दि. ५ ऑगस्ट रोजी न्यायमूर्ती एस. एस. डिग्गे यांच्या न्यायपीठात सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
लातुरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या या बहुचर्चित नीट पेपर लिक प्रकरणातील मुख्य सूत्रधार व सध्या न्यायालयीन कोठडीची हवा खात असलेले आरोपी एन. गंगाधरप्पा, संजय जाधव व जलीलखाँ पठाण यांच्यातील मध्यस्थ आयटीआय शिक्षक असलेला फरार आरोपी इरन्ना मष्णाजी कोनगुलवार हा पोलिसांबरोबरच सीबीआयला मागील महिनाभरापासून गुंगारा देत आहे. संशयित आरोपी ईरन्ना मष्णाजी कोनगुलवार हा गुन्हा दाखल झाल्यापासून आपल्या कुटुंबीयांसह फरार आहे.
फरार असलेल्या ईरन्ना कोनगुलवार याने लातूर जिल्हा सत्र न्यायालयात आपणास अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी अर्ज केला होता; परंतु तो जिल्हा सत्र न्यायालयाने फटाळला आहे. यानंतर त्याने ऍड. शेलेंद्र गंगाखेडकर यांच्या मार्फत छत्रपती संभाजीनगर खंडपीठाच्या उच्च न्यायालयत आपणास अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी अर्ज केला आहे. या अर्जावर खंडपीठात सुनावणी ठेवली असून या सुनावणीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.