मुंबई : प्रतिनिधी
मुंबईतील दादर परिसरात आज सकाळी ८ जून रोजी एक भीषण अपघात घडला. प्लाझा सिनेमा परिसरात भरधाव वेगाने जात असलेली बेस्ट बस अचानक नियंत्रणाबाहेर गेली आणि तिने रस्त्यावरील अनेक वाहनांना धडक दिली. या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला असून वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.
प्राथमिक माहितीनुसार, दादरमधील प्लाझा सिनेमाजवळ ही घटना घडली. बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बसने प्रथम एका टॅक्सीला धडक दिली. त्यानंतर काही कार आणि दुचाकींनाही जोरदार धडक बसली. अपघाताचा जोर इतका होता की एक टॅक्सी उलटल्याचे आणि एक दुचाकी रस्त्यावर फेकली गेल्याचे दृश्य समोर आले आहे.
अपघातानंतर बस रस्त्याच्या कडेला सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी ठेवलेल्या बॅरिकेड्सवर आदळली. पुढे जाऊन ती एका उत्खननासाठी वापरल्या जाणा-या ट्रकवर धडकली. या धडकेत ट्रकचा काही भाग बसच्या पुढील काचेत घुसल्याचे दिसून आले. त्यामुळे बसचे मोठे नुकसान झाले आहे.
या अपघातात एक अॅक्टिव्हा दुचाकी, एक इलेक्ट्रिक बाईक, एक टॅक्सी, एक बलेनो कार आणि एक इलेक्ट्रिक कारचे नुकसान झाले. घटनेत अॅक्टिव्हा चालक, इलेक्ट्रिक बाईकस्वार आणि बसमधील वाहक (कंडक्टर) जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर बस चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच मुंबई वाहतूक पोलिस आणि स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने वाहतूक नियंत्रणात आणण्याचे काम सुरू केले. कोतवाल गार्डन परिसरात वाहनांची मोठी गर्दी झाल्याने काही काळ वाहतूक संथ गतीने सुरू होती. मुंबई वाहतूक पोलिसांनीही नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले.
















