परभणी : या देशातील महिलांचा सर्वाधिक सन्मान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केला आहे. त्यांनी महिलांच्या कल्याणासाठी हिंदू कोड बिल सरकारमध्ये आणले. अशा या तपस्वी महामानवांचे नाव कोलंबिया विद्यापीठात जगभरातील १०० हुशार विद्यार्थ्यांच्या यादीत सुवर्णाक्षराने कोरले असून भारतातील संपूर्ण नागरिकांसाठी ही अभिमानाची गोष्ट असल्याचे प्रतिपादन सिनेअभिनेते अनिल मोरे यांनी केले.
एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्रच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंती निमित्त स्वयंरोजगार मेळावा, संविधान गौरव सन्मानपत्र सोहळ्याचे शुक्रवार, दि.२४ एप्रिल रोजी श्री शिवाजी विधी महाविद्यालय सभागृह वसमतरोड परभणी येथे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील १३५ कर्तृत्ववान महिलांचा मान्यवरांच्या हस्ते संविधान गौरव सन्मापत्र देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन वनामकृविचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी एकताचे प्रांत कार्याध्यक्ष अरूण मराठे होते. यावेळी विशेष अतिथी सिनेअभिनेते अनिल मोरे, प्रमुख पाहुणे उद्योजक अॅड. पवन निकम, शाहू महाराज कॉलेज हिंगोलीचे अध्यक्ष आसेफ कुरेशी, रशिद मास्टर, युवा उद्योजक तुषार मराठे, सौ. विजयादेवी मराठे, प्रजापिता ब्रह्मकुमारीच्या शारदा बहेन, समाजसेविका अनिता सरोदे, जयंती समिती अध्यक्ष प्रा. रेखा सावते, अॅड. नसरीन खान आदि मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना सिनेअभिनेते मोरे म्हणाले सद्यस्थितीत नागरिकांना मोबाईलचे व्यसन जडल्याचे पहावयास मिळते. सकाळी उठाल्यापासून याचा मेसेज त्याला, त्याचा मॅसेज याला पाठवित असतात. आपण काय दलाल आहोत का? असा सवाल विचारत गुड मॉर्निंग, गुड नाईट असे संदेश टाकणा-या मित्रांपासून सावध राहण्याचा सल्ला त्यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना दिला.
यावेळी कुलगुरू डॉ. इंद्र मणी म्हणाले की, ज्या घरात स्त्रीयांचा सन्मान होत नाही, तिथे लक्ष्मीचा वास असू शकत नाही. स्त्रीयांचा सन्मान होणा-या ठिकाणीच प्रत्येक चांगले कार्य यशस्वी होऊ शकते असे सांगितले. यावेळी अॅड. पवन निकम यांनी एकताचे संस्थापक अध्यक्ष अजमत खान यांचा जन्मच महिलांच्या सन्मानासाठी झाला असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्योजक अरूण मराठे यांनी सत्कार झालेल्या सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या. यापुढेही असेच सामाजिक कार्यात सक्रीय रहावे असे आवाहन केले.
प्रास्ताविकात एकताचे संस्थापक अध्यक्ष अजमत खान यांनी परभणी शहरातील महिलांच्या प्रगतीसाठी उद्योगाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. सुत्रसंचालन डॉ. मुनीब हन्फी यांनी केले. या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष प्रा. अरूण पडघन होते. या कार्यक्रमास परभणीसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील महिलांची कुटुंबियांसह मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यशस्वितेसाठी नुरूद्दीन जावेद, बाबुराव सायन्ना, दिनकर तायडे, मसुद खान, काशिनाथ उबाळे, प्रा. प्रल्हाद भोपे, श्रीरंग शिर्के, अन्सारी जावेद, शेख सरफराज, प्रा. शेख रईस, सुजाउर रहमान, शेख तौखीर यांनी प्रयत्न केले.

