16.8 C
Latur
Saturday, December 6, 2025
Homeमहाराष्ट्रकोकणात भास्कर जाधवांचे बंड

कोकणात भास्कर जाधवांचे बंड

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत मोठी फूट थेट मातोश्रीतून समज

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण नगरपालिकेची निवडणूक जवळ येत असताना शिवसेना ठाकरे गटात अचानक मोठा राजकीय कल्लोळ निर्माण झाला आहे. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांचा प्रचार न करता थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवारांचा प्रचार सुरू आहे.

चिपळूणमधील या वादाचे मूळ काही महिन्यांपासून सुरू असलेल्या संघटनात्मक मतभेदांमध्ये असल्याचे स्थानिक कार्यकर्त्यांचे मत आहे. खासदार विनायक राऊत आणि भास्कर जाधव यांच्यातील वाद अनेक वेळा सार्वजनिकरीत्या दिसून आला आहे. निवडणूक जाहीर होताच या मतभेदांचे रूपांतर सरळसरळ बंडात झाल्याचे पाहायला मिळत आहे. भास्कर जाधव यांनी पत्रकार परिषद घेत स्थानिक नेते आणि नागरिकांनी केलेल्या विनंतीवरून रमेश कदम यांना दिलेला शब्द पाळणे गरजेचे असल्याचे सांगितले. जेव्हा तिढा सोडवायला मला सांगितले, तेव्हा मी होकार दिला. आता दिलेल्या शब्दाला तडा जाऊ देणार नाही, असे जाधव यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या वक्तव्याने ठाकरेंच्या शिवसेनेत प्रचंड नाराजी पसरली आहे, हे उघड झाले आहे.

संघर्ष उफाळला
या संपूर्ण प्रकरणाची माहिती थेट मातोश्रीपर्यंत पोहोचल्याचे समजते. निवडणूक तोंडावर असताना अशी बंडखोरी पक्षासाठी धोकादायक ठरू शकते, याची जाणीव ठाकरे नेतृत्वाला झाली आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरून जाधव यांच्याशी संपर्क साधून पक्षाला नुकसान होईल असे निर्णय घेऊ नयेत, असा थेट इशारा दिल्याची माहिती मिळत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे स्थानिक पदाधिकारी यामुळे आणखीच अडचणीत आले आहेत. कारण आता कोणाची भूमिका योग्य आणि कोणाची चूक यावर अंतर्गत संघर्ष पुढे उफाळून येऊ शकतो.

दोन गट एकाच पक्षात
चिपळूण नगरपालिकेची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते. शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि भाजप अशा तिन्ही पक्षातील चुरस स्थानिक पातळीवर जाणवत आहे. ठाकरे गटाने यासाठी जोरदार तयारीही केली होती. मात्र, जाधवांच्या पावलांमुळे कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास ढासळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनेचा अधिकृत प्रचार आणि आमदारांचा स्वतंत्र प्रचार असे दोन गट एकाच पक्षात दिसल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची भीतीही व्यक्त होत आहे.

जाधवांकडे लक्ष
आता सगळ्यांच्या नजरा भास्कर जाधव पुढे कोणती भूमिका घेतात यावर खिळल्या आहेत. मातोश्रीकडून समज मिळाल्यानंतरही त्यांनी रमेश कदम यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहायचे का? की परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून स्वत:चा निर्णय बदलणार? यावर संपूर्ण चिपळूणचे आणि राज्याच्या राजकारणाचेही लक्ष लागलेले आहे. एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे, या बंडखोरीमुळे शिवसेना ठाकरे गटात अंतर्गत राजकीय असंतोष तीव्र असून, त्याचा परिणाम थेट निवडणुकीवर दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR