21.4 C
Latur
Saturday, December 7, 2024
Homeमहाराष्ट्रकांद्याच्या दरात मोठी वाढ

कांद्याच्या दरात मोठी वाढ

पुणे : प्रतिनिधी
घाऊक बाजारात दिवसेंदिवस जुन्या कांद्याची आवक घटत आहे. तर दुसरीकडे हलक्या प्रतीचा नवीन कांदा विक्रीसाठी येत आहे. त्यामुळे जुन्या कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात जुन्या कांद्याचे दर ८० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.
हे दर सुमारे महिनाभर कायम राहणार असल्याचा अंदाज व्यापारी व विक्रेत्यांनी सोमवारी वर्तविला.

मार्केट यार्डातील घाऊक बाजारात जुन्या कांद्याला प्रतिकिलोला ५५ ते ६५ रुपये दर मिळत आहे. तर नवीन कांद्याला ३० ते ४५ रुपये दर मिळत आहे. बाजारात १० ते १५ ट्रक जुन्या कांद्याची, तर ३० ते ३५ ट्रक नवीन कांद्याची आवक होत आहे.

आवक वाढल्यानंतर जुन्या कांद्याच्या दरात घट होईल, अशी माहिती मार्केट यार्डातील कांद्याच्या व्यापा-यांनी दिली आहे. डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुस-या आठवड्यात चांगल्या प्रतीचा नवीन कांदा बाजारात दाखल होईल. त्यानंतर मात्र जुन्या कांद्याच्या दरात घट होईल.

तर दुसरीकडे नाशिकच्या बाजारपेठेत कांद्याच्या भावाने पाच वर्षांतील उच्चांक गाठला आहे. नाशिकच्या बाजारपेठेत कांद्याचा भाव ५२ रुपये किलोवरून ५८ रुपये किलोवर पोहोचला आहे. सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क कमी केले आहे. बांगलादेशातील निर्यात झपाट्याने वाढली आहे.
लसणाचा तुटवडा
मुंबई बाजार समितीत कांदा आणि लसणाचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. कांद्याचे दर ८० रुपये किलो तर लसणाचे दर ४०० रुपयांवर जाऊन पोहोचले आहेत. तर मुंबईतील किरकोळ बाजारात कांदा ७० ते ८० रुपये दराने विकला जात आहे. राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांदा आणि लसूण यांची आवक कमी झाल्यामुळे तुटवडा निर्माण झाला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR