मुंबई : प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या बालेकिल्ला मानल्या जाणा-या नागपूरच्या पदवीधर मतदारसंघात काँग्रेसने विजय मिळवत भाजपला मोठा दणका दिला आहे. यावरून आता काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी काँग्रेसचे उमेदवार अभिजित वंजारी यांचे अभिनंदन तर केलेच, शिवाय भाजपला आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला टोलादेखील लगावला आहे. ‘संघाच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचा झेंडा नेहमी फडकत राहील,’ असे म्हणत नाना पटोले यांनी डिवचले आहे.
काँग्रेसचे नेते नाना पटोले म्हणाले की, सर्व शासकीय यंत्रणा, सत्ता आणि पैशाचा जोर उधळवून लावत नागपूर पदवीधर मतदारसंघात काँग्रेस-महाविकास आघाडीचा तिरंगा पुन्हा डौलाने फडकला आहे. अभिजित वंजारी यांच्या पाठीशी सुशिक्षित पदवीधरांनी भक्कम ताकद उभी केली, असे म्हणत टोला लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या निकालांसंदर्भात अतिघाईने केलेले ट्विट आणि ते रीट्विट करणा-या देवेंद्र फडणवीसांना अखेर ते ट्विट डिलीट करावे लागले. फडणवीस यांनी पराभवाची कितीही सारवासारव केली, तरी हा पराभव लपवता येणार नाही. नागपुरात काँग्रेसचाच झेंडा कायम फडकत राहील, असे म्हणत त्यांनी भाजपला डिवचले आहे.
उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र आणि कर्नाटक या चार राज्यांतील २८ शिक्षक व पदवीधर मतदारसंघांच्या निकालांचा दाखला देत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर उपरोधिक टीका केली होती. बुधवारी (२८ ऑक्टोबर) त्यांनी सोशल मीडियावर लिहिले की, जिथे ईव्हीएम नसून मतपत्रिकांवर निवडणुका झाल्या, तिथे काँग्रेसला किती जागा जिंकता आल्या? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. त्यानंतर अनेक नेत्यांनी हे ट्विट रीट्विट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ते ट्विट रीट्विट केले होते. पण, त्यानंतर नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्याच बालेकिल्ल्यात भाजपचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे पराभूत झाल्याचे अधिकृतपणे समोर येताच, हे ट्विट डिलिट करण्याची वेळ भाजप नेत्यांवर आली. यावरून आता काँग्रेसने भाजपला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डिवचले आहे.
















