नवी दिल्ली : राज्यसभेसाठी भाजपने आज उमेदवार यादी जाहीर केली असून महाराष्ट्रातून विनोद तावडे, रामदास आठवले, रामराव वडकुते आणि माया इवनाते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ७ जागांसाठी १६ मार्च रोजी मतदान होणार आहे.
भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी ही यादी जाहीर केली. राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ५ मार्च असून ६ मार्च रोजी अर्जांची छाननी होईल. उमेदवारांना माघार घेण्यासाठी ९ मार्चपर्यंतची मुदत आहे. विनोद तावडे महाराष्ट्र विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपद भूषविले आहे. त्यांनी शालेय शिक्षण, उच्च आणि तांत्रिक शिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास तसेच मराठी भाषा (भाषा) आणि संस्कृती खात्याचे मंत्रिपदही भूषविले आहे.
मात्र, त्यानंतर पुन्हा त्यांना पक्षसंघटनेत काम करण्याची संधी देण्यात आली. सध्या ते भाजपच्या महाराष्ट्र युनिटचे सरचिटणीस आहेत. अखिल भारतीय राष्ट्रीय कार्यकारी परिषदेचे सदस्य आणि १२ व्या आणि १३ व्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या समन्वय समितीचेही ते प्रमुख सदस्य होते. आता राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यामुळे ते पुन्हा एकदा संघटनात्मक कामातून मुख्य प्रवाहात आलेत.
आठवलेंना तिस-यांदा संधी
रिपाइंचे रामदास आठवले यांना यंदा राज्यसभेची उमेदवारी मिळणार की नाही, याबाबत साशंकता होती. त्यांचा पत्ता कट होणार, अशी शक्यताही वर्तवली जात होती. मात्र, भाजपने आपल्या कोट्यातून सलग तिस-यावेळेस आठवलेंना राज्यसभेची संधी दिली.
वडकुते धनगर समाजाचे नेते
हिंगोली जिल्ह्यातले भाजप नेते व माजी आमदार रामराव वडकुते यांना यंदा भाजपने राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली. धनगर समाजाचे नेते ही वडकुते यांची ओळख. ते २००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्यांना पक्षाने विधानसभेची उमेदवारीही दिली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला. पुढे २००९ मध्ये ही जागा काँग्रेसच्या वाट्याला गेली. येथून युवक काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राजीव सातव यांची वर्णी लागली. त्यानंतर वडकुते यांना राष्ट्रवादी काँग्रेसने विधान परिषदेवर पाठवले. मात्र, २०१९ विधानसभा निवडणुकीपूर्वी ते भाजपमध्ये आले. आता त्यांना पक्षाने राज्यसभेची उमेदवारी दिली.
इवनाते आदिवासी नेत्या
आदिवासी नेत्या असणारे माया इवनाते या सध्याच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या निकटवर्तीय म्हणून गणल्या जातात. अनुसूचित जमातीच्या राष्ट्रीय आयोगावर त्यांनी सदस्य म्हणून काम केले. त्या नागपूरच्या माजी महापौर राहिल्या आहेत. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीतही त्या नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या. सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही नागपूरचे आहेत. त्यामुळे नागपूरच्या लेकीला भाजपने राज्यसभेची संधी दिली.

