कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये एकूण २९३ जागांपैकी २९२ जागांचे निकाल राष्ट्रीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर लागले. त्यापैकी २०६ जागांवर भाजपने विजय मिळवला. १५ वर्ष बंगालवर राज्य करणा-या तृणमूल काँग्रेसला शंभरीही गाठता आली नाही. टीएमसीला ८० जागांवरच विजय मिळवता आला. इतकेच नव्हे माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. भाजपचे सुवेंदु अधिकारी यांनी ७३,९१७ मते मिळवली तर ममता बॅनर्जी यांना ५८,८१२ मते मिळाली. त्यामुळे ममता यांचा १५,१०५ मतांनी पराभव झाला. आता नव्या भाजप मुख्यमंर्त्यांचा शपथविधी ९ मे रोजी होणार आहे.
ममता बॅनर्जींनंतर पश्चिम बंगालमध्ये महिला नेतृत्व कायम राहावे असा विचार झाल्यास मुख्यमंत्रीपदासाठी दीर्घकाळ राजकारणाचा अनुभव असलेल्या रूपा गांगुली यांचे नाव चर्चेत आहे. रूपा गांगुली या ‘महाभारत’ मालिकेतील ‘द्रौपदी’ भूमिकेतून घराघरात पोहोचवल्या. २०१५ पासून त्या पश्चिम बंगालच्या राजकारणात भाजपची भूमिका प्रभावीपणे मांडत आहेत. याशिवाय, ममता बॅनर्जींना सलग दुस-यांदा विधानसभा निवडणुकीत पराभवाचे पाणी पाजणारे सुवेंदु अधिकारी देखील या शर्यतीत आहेत.
त्यांना बंगालच्या राजकारणाचा दीर्घ अनुभव आहे आणि ते अतिशय प्रभावी नेते आहेत. या दोघांव्यतिरिक्त प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य या नावाचीदेखील चर्चा आहे. एक हुशार राजकारणी म्हणून ते नावाजलेले आहेत. जुलै २०२५ पासून ते भाजपचे पश्चिम बंगाल प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून पश्चिम बंगालचे प्रतिनिधित्व करणारे राज्यसभेचे सदस्य म्हणूनही कार्यरत आहेत.

