24.6 C
Latur
Saturday, October 5, 2024
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांना दाखविले काळे झेंडे ; ८ जणांवर गुन्हा

मुख्यमंत्र्यांना दाखविले काळे झेंडे ; ८ जणांवर गुन्हा

भाईंदर : प्रतिनिधी
मीरा-भाईंदर शहरात विविध नागरी समस्या ज्वलंत असताना पालिका प्रशासन त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने पालिकेत होणारे गैरव्यवहार तसेच कामचुकारपणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट) च्या पदाधिका-यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविले. याप्रकरणी नवघर पोलिस ठाण्यात राष्ट्रवादीच्या ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री ३० सप्टेंबर रोजी आ. प्रताप सरनाईक आयोजित सनातन राष्ट्रसंमेलनाच्या समारोपासाठी मीरा-भाईंदरमध्ये आले होते, त्यावेळी त्यांच्या हस्ते पालिकेच्या अनेक विकासकामांचे तसेच उपक्रमांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांना शहरातील समस्या निदर्शनास आणून देण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादी (एसपी) ने काळे झेंडे दाखविण्याचा निर्णय घेतला होता. तसे पत्र त्यांनी पोलिस आयुक्तांना दिले होते. त्यावर नवघर पोलिसांनी राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांना ३० सप्टेंबर रोजी सकाळी भारतीय दंड संहितेतील कलम १६८ अंतर्गत नोटीस बजावून त्यांना ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू केली.

मात्र राष्ट्रवादीचे पदाधिकारी आदल्या दिवशीच भूमिगत झाल्याने ते पोलिसांच्या हाती लागले नाहीत. मुख्यमंत्र्यांचा ताफा राष्ट्रसंमेलनाकडून मीरारोडच्या आप्पासाहेब धर्माधिकारी सभागृहाकडे निघाला असताना सायंकाळी ७.१५ च्या सुमारास राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून पालिका व राज्य शासनाचा निषेध केला. यावेळी नवघर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत त्यातील ८ जणांवर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR