इस्लामाबाद : मंगळवारी दुपारी १ वाजता पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथील जिल्हा न्यायालयात एक शक्तिशाली स्फोट झाला. पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार, या स्फोटात १३ जणांचा मृत्यू झाला आणि २१ जण जखमी झाले.
स्फोट इतका मोठा होता की तो पोलिस लाईन्स मुख्यालयापर्यंत ऐकू आला, त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात घबराट पसरली. अपघातानंतर लगेचच बचाव पथके आणि सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले, त्यांनी परिसराला वेढा घातला आणि तपास सुरू केला. पोलिस अधिका-यांनी सांगितले की, न्यायालयाच्या पार्किंग क्षेत्रात उभ्या असलेल्या वाहनांमध्ये हा स्फोट झाला. स्फोटात अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे आणि सुरक्षा संस्था आणि बॉम्ब निकामी करणारे पथक ढिगा-यांची तपासणी करत आहेत.
हा स्फोट स्फोटक यंत्रामुळे झाला, गॅस सिलिंडर फुटला की काही तांत्रिक बिघाडामुळे झाला याचा तपास सुरू आहे. इस्लामाबाद स्फोटाच्या एक दिवस आधी, पाकिस्तानी लष्कराने खैबर पख्तूनख्वा येथील वाना शहरातील आर्मी कॉलेजवर झालेला दहशतवादी हल्ला उधळून लावला होता. सहा पाकिस्तानी तालिबानी लढवय्ये महाविद्यालयावर हल्ला करण्यासाठी आले होते. वाना परिसर हा ब-याच काळापासून पाकिस्तानी तालिबान, अल-कायदा आणि इतर अतिरेकी गटांचा बालेकिल्ला मानला जात आहे.
लष्कराच्या कारवाईत दोन दहशतवादी ठार झाले, तर तीन जण कॉलेज कॅम्पसमध्ये घुसल्यानंतर एका इमारतीत कोंडले गेले. पोलिस अधिकारी आलमगीर मेहसूद यांच्या मते, सर्व कॅडेट, प्रशिक्षक आणि कर्मचारी सुरक्षित आहेत. तथापि, या हल्ल्यात सुमारे १६ नागरिक आणि काही सैनिक जखमी झाले आणि महाविद्यालयाजवळील अनेक घरांचेही नुकसान झाले.

