नवी दिल्ली : दिल्लीतील इस्रायली दूतावासाजवळ मंगळवारी संध्याकाळी बॉम्बस्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे. माहिती मिळताच दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल टीमने घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. टीव्ही मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलिसांच्या पथकाने आजूबाजूच्या परिसराला वेढा घातला आहे. हा स्फोट नेमका कशाचा होता आणि यामागे कोणाचा हात आहे, याबाबत माहिती समोर आलेली नाही. दिल्ली अग्निशमन सेवा संचालक अतुल गर्ग यांनी सांगितले की, आतापर्यंत घटनास्थळी काहीही सापडले नाही.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, दिल्ली पोलिसांना मंगळवारी (२६ डिसेंबर) संध्याकाळी नवी दिल्लीत असलेल्या इस्रायल दूतावासाजवळ स्फोट झाल्याची माहिती मिळाली. दिल्ली अग्निशमन सेवेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी ५.४७ वाजता कॉल आला आणि दिल्ली पोलिसांच्या पीसीआर (पोलीस नियंत्रण कक्ष) वरून हस्तांतरित करण्यात आला. पोलीस आणि अग्निशमन विभागाचे अधिकारी घटनास्थळी असून शोधमोहीम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या दिल्ली पोलिसांच्या क्राइम युनिटचे एक पथक आणि फॉरेन्सिक टीम इस्रायली दूतावासाजवळ तपास करत आहेत.