पणजी : गोव्यातील अर्पोरा गावात असलेल्या बिर्च बाय रोमियो लेन नाइटक्लबमध्ये ६ डिसेंबरच्या मध्यरात्री आग लागल्यानंतर काही तासांतच क्लबचे दोन्ही मालक सौरभ आणि गौरव लूथरा थायलंडला पळून गेले.
पोलिसांनी घटनेनंतर एफआयआर नोंदवून दोघांचा शोध सुरू केला. ७ डिसेंबर रोजी दोघांविरुद्ध लुकआउट सर्कुलर जारी केले, परंतु इमिग्रेशन रेकॉर्डवरून असे दिसून आले की ते इंडिगो फ्लाइट ६ई १०७३ ने देश सोडून गेले होते. पोलिसांनुसार, दोघे ७ डिसेंबरच्या सकाळी ५:३० वाजताच इंडिगोच्या विमानाने फुकेतला रवाना झाले. त्यांना पकडण्यासाठी आता इंटरपोलची मदत मागितली आहे. तपासात हेदेखील समोर आले आहे की क्लबकडे अग्निशमन दलाचे एनओसी (ना हरकत प्रमाणपत्र) नव्हते. परवानादेखील अपु-या माहितीच्या आधारे जारी करण्यात आला होता. पणजीपासून २५ कि.मी. दूर असलेल्या क्लबमध्ये आग लागल्याने २५ लोकांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये नाइटक्लबचे २० कर्मचारी आणि ५ पर्यटक यांचा समावेश आहे.
क्लबसाठी मार्गदर्शक सूचना जारी
पोलिसांनी क्लबचे ऑपरेशनल स्टाफ भारत कोहली यांना दिल्लीतून ट्रान्झिट रिमांडवर अटक केली आहे. याशिवाय, चीफ जनरल मॅनेजर राजीव मोडक, जनरल मॅनेजर विवेक सिंह, बार मॅनेजर राजीव सिंघानिया आणि गेट मॅनेजर रियांशु ठाकूर यांनाही अटक करण्यात आली आहे. प्रशासनाने क्लब चेनच्या इतर दोन प्रॉपर्टी सील केल्या आहेत. दोन्ही प्रॉपर्टी वादात होत्या.

