पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी लोकसंख्या वाढीच्या मुद्यावर भाष्य करताना नागरिकांनी स्वत:हून जबाबदारी घ्यावी असे आवाहन केले. पुण्यात आयोजित कार्यक्रमात बोलताना पवार यांनी एका वैयक्तिक अनुभवाचा उल्लेख करत लोकसंख्या नियंत्रणाची गरज अधोरेखित केली.
पवार म्हणाले, ‘‘मी एका भगिनीला विचारलं, एक मुलगी इथे आहे, दुसरी कुठे आहे? ती म्हणाली, घरी आईकडे ठेवली आहे. दोन मुली असताना ती पुन्हा गरोदर दिसली. विचारल्यावर ती म्हणाली, ‘आहे पोटात.’ मी म्हणालो, आता बास करा. आता तुम्हीच सांगा, वरून ब्रह्मदेव जरी आला, तरी लोकसंख्या वाढ थांबवणं कठीण आहे.’’ते पुढे म्हणाले, प्रत्येकाने आपल्या स्तरावर काळजी घेतली पाहिजे. कोणी चुकत असेल, तर त्याला सांगायला हवं , मुलगा असो किंवा मुलगी, दोनवर थांबायला शिका. सरकारने नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती यांसाठी दोन अपत्यांचा नियम केला आहे.
मात्र खासदार-आमदारांसाठी असा कायदा नाही. तो आमच्या हातात असता, तर दोनपेक्षा जास्त अपत्य असलेल्या लोकांना निवडणुकीत उभे राहता आले नसते. पुढे संधी मिळाल्यास त्यावर विचार करू. अजित पवार यांच्या या वक्तव्याने पुन्हा एकदा लोकसंख्या नियंत्रणावरील चर्चा तापली आहे.

