तेहरान : इराण-इस्रायल यांच्यातील तणाव वाढला आहे. इराणची सत्ता खेचणार असा इशारा इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी दिल्यानंतर इराणकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. जर इराणच्या राष्ट्रीय सुरक्षेवर आणि हितसंबंधांवर हल्ला झाला तर एका तासापेक्षा कमी वेळात इस्रायल राहण्यायोग्य राहणार नाही असा इशारा इराणी संसदेतील राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण समितीचे प्रमुख इब्राहिम अझीझी यांनी दिला.
अझीझी यांनी इस्रायलच्या प्रमुख पायाभूत सुविधा दर्शवणारा एक नकाशाही शेअर केला. इराणच्या इशा-यामध्ये पाणीपुरवठा, वीज निर्मिती, तेल शुद्धीकरण कारखाने, इंधन साठवणूक, पूल आणि वाहतूक जाळे यांसारख्या प्रमुख लक्ष्यांचा उल्लेख आहे. इराणच्या सध्याच्या राजवटीला हटवण्याचे आवाहन करणा-या नेतान्याहूंच्या वक्तव्याला प्रत्युत्तर म्हणून इब्राहिम अझीझी यांनी अमेरिकन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली. इराणच्या राष्ट्रीय हितांविरुद्ध आणि सुरक्षेविरुद्ध कोणत्याही कृतीला प्रत्युत्तर दिले जाईल असा इशारा अझीझी यांनी दिला. त्यांनी शेअर केलेल्या नकाशात दिमोना अणुसंशोधन केंद्र, एक सागरी जलशुद्धीकरण प्रकल्प, वीज प्रकल्प, तेल शुद्धीकरण कारखाना आणि एक प्रमुख पूल यासह इस्रायलची अनेक महत्त्वाची ठिकाणे दाखवण्यात आली आहेत. इराण केवळ युद्धाच्या काळात प्रत्युत्तर म्हणून लष्करी लक्ष्यांवरच हल्ला करणार नाही तर तो इस्रायलच्या अत्यावश्यक सेवा आणि पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्याची धमकीही देत आहे.
पाणीपुरवठ्यापासून ते वीज प्रकल्पांपर्यंत करणार लक्ष्य
इराणने दिलेल्या इशा-यांमध्ये आणि माहितीमध्ये इस्रायलच्या अनेक महत्त्वाच्या पायाभूत सुविधा स्थळांचा उल्लेख आहे. जर दोन्ही देशांमध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणावर संघर्ष सुरू झाला तर त्याचा सर्वसामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनावर किती परिणाम होऊ शकतो असा प्रश्न इराणच्या टार्गेट यादीकडे पाहून निर्माण होतो. अमेरिका आणि इस्रायलकडून होणा-या संभाव्य नवीन लष्करी हल्ल्यांमुळे तणाव वाढलेला असतानाच इराणने ही धमकी दिली आहे.
















