उधमपूर : जम्मू-काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यातील रामनगर भागात भीषण अपघात घडला. खगोट भागात भरधाव बस अनियंत्रित होऊन उलटल्याची घटना घडली. या अपघातात १७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर काही जण गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच प्रशासन आणि पोलीस बचाव कार्यासाठी धावले. त्यांनी तातडीने घटनास्थळी रुग्णवाहिका पाठवली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. तर जखमींनाही उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल केले. स्थानिक नागरिकही मदतीला धावले आहेत.
केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी उधमपूरमधील रामनगरमधील दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले की, मी दुर्घटनेविषयी माहिती घेत आहो. उपायुक्तांशी बोलणे झाले आहे. प्रशासनाला तातडीने मदत करण्याचे निर्देश दिले आहेत’. डॉ. जितेंद्र सिंह यांनी पुढे म्हटले की, रामनगरहून ऊधमपूरला जाणा-या सरकाराच्या बसचा अपघात झाला. प्रशासनाने क्षणाचाही विलंब न करता तातडीने मदत कार्य सुरू केले आहे .
मृतांचा आकडा अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गंभीर जखमी प्रवाशांना एअरलिप्ट करण्याची व्यवस्था केली जात आहे. अपघातानंतर रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. पोलिसांनी वाहतूक इतरत्र वळवली आहे. या भीषण अपघातानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. या अपघातानंतर स्थानिक नागरिकांकडून रस्त्याची गुणवत्ता सुधारण्याची मागणी केली जात आहे.
अपघातानंतर काही प्रवासी तातडीने बसमधून बाहेर आले. अनेकांनी त्यांच्या नातेवाईकांना बसमधून बाहेर काढले. अपघातात काही प्रवाशांनी घरातील जवळच्या लोकांना गमावले. या प्रवाशांनी तातडीने प्रशासन आणि त्यांच्या नातेवाईकांना कळवले. या अपघातात बसचा चक्काचूर झाला आहे. १७ प्रवाशांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

