नवी दिल्ली : कोरोना संकटामुळे आर्थिक स्रोत आटलेल्या मोदी सरकारला नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठी खुशखबर मिळाली आहे. कारण, डिसेंबर महिन्यात वस्तू आणि सेवा करातून (जीएसटी) सरकारला विक्रमी उत्पन्न मिळाले आहे. डिसेंबरमधील महसूल हा २०२० मध्ये जीएसटीच्या माध्यमातून मिळालेले सर्वाधिक उत्पन्न आहे.
केंद्रीय अर्थमंत्रालयाने शुक्रवारी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली. डिसेंबर महिन्यात जीएसटीच्या माध्यमातून १.१५ लाख कोटी रुपयांचा महसूल मिळाला. डिसेंबर २०१९ च्या तुलनेत हे उत्पन्न १२ टक्क्यांनी जास्त आहे. डिसेंबरमध्ये मिळालेल्या एकूण १,१५,१७४ कोटीच्या जीएसटीमध्ये २१,३६५ कोटींचा सीजीएसटी आणि २७,८०४ कोटींचा एसजीएसटी, ५७,४२६ कोटींचा आयजीएसटी आणि उपकराच्या माध्यमातून मिळालेल्या ८,५७९ कोटींचा समावेश आहे. देशात जीएसटी लागू झाल्यापासून एकाच महिन्यात मिळालेला हा सर्वाधिक महसूल आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यात सरकारला १,१३,८६६ कोटींचा जीएसटी मिळाला होता.
हे अर्थव्यवस्था वेगाने रुळावर येत असल्याचे संकेत मानले जात आहेत. यंदाच्या आर्थिक वर्षातील तिस-या तिमाहीत जीएसटी संकलनातील सरासरी वृद्धीचा दर ७.३ टक्के इतका होता. त्यापूर्वीच्या पहिल्या आणि दुस-या तिमाहीत हा दर अनुक्रमे (-) ८.२ आणि (-) ४१.० टक्के इतका होता.
जीएसटीची विक्रमी कमाई फक्त तीनवेळा
देशात वस्तू व सेवा कर कायदा लागू झाल्यापासून आतापर्यंत फक्त तीनदाच १.१ लाख कोटीपेक्षा अधिक महसूलाचे संकलन झाले आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात सलग तिस-या महिन्यात एक लाख कोटींपेक्षा अधिक जीएसटी संकलन झाले आहे.
अमेरिकेत २४ तासांत ३७४४ जणांचा मृत्यू