नवी दिल्ली : एचसीएल टेक्नॉलॉजीजच्या चेअरपर्सन रोशनी नदार-मल्होत्रा ८४,३३० कोटी रुपयांच्या संपत्तीसह भारतातील सर्वात श्रीमंत महिला ठरल्या आहेत. ३१ डिसेंबर २०२१ रोजी महिलांच्या वैयक्तीक संपत्तीच्या आधारे तयार करण्यात आलेल्या ‘कोटक प्रायव्हेट बँकिंग हुरून – लीडिंग वेल्थ वूमन लिस्ट’च्या तिस-या आवृत्तीनुसार, रोशनी यांनी सलग दुस-या वर्षी देशातील सर्वात श्रीमंत महिलेचे स्थान कायम राखले आहे.
अहवालानुसार बायोकॉनच्या किरण मुझुमदार-शॉ यांना मागे टाकून नायकाच्या फाल्गुनी नायर ५७,५२० कोटी रुपयांच्या संपत्तीसह भारतातील सर्वात श्रीमंत सेल्फ मेड रिच बनल्या.
भारतातील सर्वात श्रीमंत महिलांच्या २०२१ च्या आवृत्तीत कॉर्पोरेट जगतात उच्च पदांवर प्रस्थापित झालेल्या महिलांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले होते. यामध्ये २५ नवीन चेह-यांनी स्थान मिळवले आहे, ज्यांनी २०२० मधील १०० कोटींच्या तुलनेत २०२१ मध्ये ३०० कोटी रुपये कट ऑफ म्हणून घेतले आहेत.
अहवालात म्हटले की २०२० मधील २,७२५ कोटी रुपयांच्या तुलनेत २०२१ मध्ये महिलांची सरासरी संपत्ती वाढून ४,१७० कोटी रुपये झाली आहे. याशिवाय, जेटसेटगोची ३३ वर्षीय कनिका टेकरीवाल ही यादीतील सर्वात तरुण सेल्फ मेड रिच महिला ठरली आहे.
या श्रीमंत महिलांच्या वयाबाबत अहवालात नमूद करण्यात आले की, या यादीतील महिलांचे सध्याचे सरासरी वय पूर्वीच्या यादीच्या तुलनेत ५५ वर्षांपर्यंत वाढवण्यात आले आहे. ४० वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या २० पैकी ९ महिला सेल्फमेड रिच आहेत.
श्रीमंत महिलांच्या यादीतील १२ महिला फार्मास्युटीकल उद्योगाशी संबंधित आहे. तर महिला ११ आरोग्यसेवेशी संबंधित आहेत. तसेच ९ महिला ग्राहकोपयोगी वस्तूंशी संबंधित आहेत. या महिलांच्या ठिकाणांविषयी सांगायचे झाले तर २५ महिला उद्योजक दिल्लीतील आहेत.