21.9 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeउद्योगजगतअदानींचा गनिमीकावा, अंबानींना भिडणार!

अदानींचा गनिमीकावा, अंबानींना भिडणार!

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरलेले अदानी समूहाचे सर्वेसर्वा उद्योगपती गौतम अदानी लवकरच एक नवी कंपनी सुरू करणार आहेत. जर सर्व नियोजित रणनितीनुसार घडले तर येत्या काही दिवसांत मुकेश अंबानींच्या जिओ आणि सुनील भारती मित्तल यांच्या एअरटेलला कडवे आव्हान उभे ठाकणार आहे.

अदानींचा टेलिकॉम स्पेक्ट्रममध्ये रस
अदानी समूहाने टेलिकॉम स्पेक्ट्रममध्ये रस दाखवला आहे. कंपनीने यासाठीचे नियोजन सुरू केले आहे. सरकारने 5जी स्पेक्ट्रमच्या लिलावासाठी नव्या कंपन्यांकडून अर्ज मागवले आहेत. यासाठी अंतिम मुदत ८ जुलैपर्यंत होती. सरकारला यासाठी एकूण ४ अर्ज प्राप्त झाले आहेत.

स्पेक्ट्रम लिलावासाठी ४ अर्ज
5जी स्पेक्ट्रमच्या लिलावाची माहिती असणा-या सुत्रांच्या मतानुसार टेलिकॉम सेक्टरमधील तीन खासगी कंपन्या जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडियाने ६ जुलै रोजी होणा-या लिलावासाठी अर्ज दाखल केला आहे. तर अर्ज दाखल करणारी चौथी कंपनी अदानी यांची आहे. अदानींच्या याच नव्या कंपनीनें नॅशनल लॉन्ग डिस्टेंस आणि इंटरनॅशनल लॉन्ग डिस्टेंस लायसन्स प्राप्त केले आहे.

5जी स्पेक्ट्रमचा लिलाव
सरकारनं 5जी स्पेक्ट्रमचा लिलाव नियोजित केलेल्या वेळेनुसार होणार आहे. १२ जुलै रोजी अर्ज दाखल केलेल्या कंपन्यांची माहिती प्रसिद्ध करण्यात येणार आहे. सरकारने एकूण ७२,०९७.८५ मेगाहर्टझ् स्पेक्ट्रमचा लिलाव करण्याची तयारी केली आहे. याची किंमत जवळपास ४.३ लाख कोटी रुपये इतकी असणार आहे.

अंबानी-अदानी यांच्यात टक्कर?
मुकेश अंबानी आणि गौतम अदानी दोघेही आशियातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत समावेश असलेले भारतीय उद्योगपती आहेत. आतापर्यंत दोन्ही उद्योगपतींनी वेगवेगळ्या व्यवसायात आपला दबदबा निर्माण केला आहे. दोघांमध्ये आजवर कधीच व्यावसायिक पातळीवर थेट समोरासमोर स्पर्धा झालेली नाही.

मुकेश अंबानींचा रिलायन्स समूह तेल, रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्सपासून टेलिकॉम आणि रिटेल सेक्टरमध्ये काम करतो. तर अदानी समूह बंदर, कोळसा, ग्रीन एनर्जी, वीज वितरण आणि हवाई सेक्टरमध्ये काम करत आला आहे. पण नुकतच अदानी समूहाने पेट्रोकेमिकल्स उद्योगात एन्ट्री घेतली आहे, तर रिलायन्स समूहाने ग्रीन एनर्जी क्षेत्रात प्रवेश केला आहे. आता टेलिकॉम सेक्टरमध्येही अदानी समूह अंबानींना टक्कर देण्यासाठी सज्ज असल्याची माहिती समोर आली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या