नवी दिल्ली : भारतात एक काळ असा होता, जेव्हा कार म्हटले की, डोळ््यासमोर फक्त एकच चित्र उभे राहायचे, ते म्हणजे अॅम्बेसिडर कारचे. अॅम्बेसेडर ही भारताची क्लासिक कार म्हणून ओळखली जाते. अॅम्बेसेडर ही भारतात बनलेल्या पहिल्या कारपैकी एक होती. आता या कारची निर्माता हिंदुस्थान मोटर्स आपले इलेक्ट्रिक वाहन भारतात आणण्याच्या तयारीत आहे. बिझनेस इनसाइडरच्या वृत्तानुसार हिंदुस्थान मोटर्स इलेक्ट्रिक वाहन सेगमेंटमध्ये प्रवेश करण्याचा विचार करत आहे.
इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी लक्षात घेता भारतीय वाहन उद्योग या क्षेत्रात पुढे जात आहे. अशा परिस्थितीत बहुतेक कंपन्या त्यांचे इलेक्ट्रिक वाहन लॉन्च करत आहेत आणि काही त्याची तयारी करत आहेत. आता या यादीत हिंदुस्थान मोटर्सच्या नावाचाही समावेश झाला आहे. हिंदुस्थान मोटर्सला युरोपियन कंपनीशी हातमिळवणी करून आपला व्यवसाय वाढवायचा आहे, असे अहवालात म्हटले आहे. कंपनीने युरोपियन ईव्ही निर्मात्यासोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. कंपनी आगामी काळात मोठी घोषणा करू शकते, असे बोलले जात आहे.
सध्या दोघेही मेकर इक्विटी स्ट्रक्चरवर काम करत आहेत. सध्याच्या प्रस्तावानुसार ंिहंदुस्थान मोटर्सचा भागीदारीमध्ये ५१ टक्के हिस्सा असेल आणि युरोपियन ब्रँडचा ४९ टक्के हिस्सा असेल. या भागीदारीअंतर्गत केवळ इलेक्ट्रिक कारच नाही, तर इलेक्ट्रिक टू-व्हीलरवरही लक्ष केंद्रित केले जाईल. कंपनी पहिले उत्पादन म्हणून इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार आहे.