नवी दिल्ली : भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने भारतात पहिल्यांदाच बासमती तांदळासाठी सर्वसमावेशक नियामक मानके अधिसूचित केली आहेत. याबाबत केंद्रकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहे.
नवीन मानकांनुसार बासमती तांदळामध्ये नैसर्गिक सुगंध असावा. तसेच हा तांदुळ कृत्रिम रंग, पलिशिंग एजंट आणि कृत्रिम सुगंधांपासून मुक्त असावा, असे आदेश दिले आहेत. नवीन मानके १ ऑगस्ट २०२३ पासून लागू होतील.
बासमती तांदळाचा व्यवसाय सुधारणे आणि देशांतर्गत आणि जागतिक स्तरावर ग्राहकांच्या हिताचे रक्षण करणे हा नव्या मानकांचा उद्देश असल्याचे केंद्राने म्हटले आहे. भारतात बासमती तांदळाच्या सुमारे ३५-३९ विविध जाती आहेत. एपीईडीएकडील डेटानुसार चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-नोव्हेंबर दरम्यान बासमती तांदळाची शिपमेंट २.७३ दशलक्ष टन पर्यंत वाढली आहे. २०२१-२२ मधील २.४ दशलक्ष टनांच्या तुलनेत १३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०२२-२३ मध्ये भारतातून १.६ दशलक्ष टन तांदूळ निर्यात होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.